कृषि दूतांनी जमिनीच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करावी- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी : कंपोस्ट खताची निर्मिती, गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणावर वापर, शेतीतील पालापाचोळा कुजवून त्यापासून उत्तम कंपोस्ट खत तयार करणे, कंपोस्ट खत तयार करताना कंपोस्ट कल्चरचा वापर करणे, शेती करताना प्लास्टिकचा वापर करू नये, तसेच प्लास्टिक मुक्त गाव तयार करून जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कृषि दूतांनी समाजामध्ये व शेतकर्यांमध्ये जागृती निर्माण करावी, त्यासाठी डिजिटलायझेशन तंत्राचा वापर करावा व जमिनीची उत्पादकता वाढून शेतकर्यांचे उत्पादन दुप्पट करण्यास मदत करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक शिक्षण डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगाव या महाविद्यालयात साजरा करण्यात आला. क्षारपड जमिनी होण्यास प्रतिबंध करणे हा या वर्षीच्या जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा विषय होता. याप्रसंगी डॉ. प्रमोद रसाळ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला मृद व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. अहिरे मार्गदर्शन करताना म्हणाले भारत सरकारच्या सॉइल हेल्थ कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांनी आपल्या मातीचे परीक्षण करून घ्यावे व खतांचा संतुलित वापर करू करून शेतकर्यांनी आपल्या जमिनीची उत्पादकता वाढवावी. कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना जमीनीच्या आरोग्य विषयी माहिती देऊन शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

याप्रसंगी डॉ. भाकरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की पाण्याच्या व खताच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड होतात त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येते व उत्पादकता कमी होते. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य धोक्यात येणार नाही व मानवाचे आरोग्य सुद्धा खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. पाण्याच्या व खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे भौतिक,जैविक व रासायनिक गुणधर्म बिघडतात व आशा खराब झालेल्या जमिनी सुधारण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कार्यक्रमाचा उद्देश सांगून डॉ. सखेचंद अनारसे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रेरणा भोसले यांनी केले.

या ऑनलाईन कार्यक्रमाला मृद व कृषि रसायनशास्त्र विभागाचे डॉ. नितीन रणशूर, डॉ. विजय पाटील, डॉ. रामचंद्र नाझीरकर, डॉ. मनोज गुड, सौ. वैशाली पोदे, सौ. अंजली देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती भांगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या