राहुरी / बाळकृष्ण भोसले : नगर-मनमाड महामार्गावर गुहापाट ते चिंचोली दरम्यान राजस्थानी ढाब्याजवळ जीप, कंटेनर व दुचाकी वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकेरी केलेल्या वाहतुकीमुळे समोरासमोर झालेल्या या अपघातात ठार झालेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील एका भाविक महिलेचा समावेश आहे. गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दहा जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेतत्वावर चालणारी क्रूझर क्रमांक- एमएच २० इजी १४०२ व नगरहून मनमाडकडे जाणारा कंटेनर (क्रमांक एचआर ४५ बी ४४७०) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात जीपमधील मध्यप्रदेशातील सेलू येथील पुष्पा जैस्वाल या भाविक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन पुरुष भाविकांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन दुचाकीही सापडल्या. क्रुझरमध्ये महिला भाविक प्रवास करत होत्या. अपघात इतका भीषण होता की क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला आहे.
या महामार्गाचे सध्या नव्याने बांधकाम सुरू आहे. तर या लगतच गँस पाईपलाईनचे खोदाईचे काम सुरू आहे. हि दोन्ही कामे बरोबरच सुरू असल्याने वारंवार वाहतूकीचा खोळंबा होत असतो. दोन्ही कामे सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक चालू होती. कंत्राटदाराने कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. रात्री चालकांसाठी दिशादर्शक फलक अथवा रेडियम पट्टी लावलेल्या नाहीत. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात राहुरी येथील जगताप नावाचा दुचाकीस्वार जखमी झाला तर अन्य एक दुचाकीस्वार दोन्ही गाड्यांमध्ये सापडल्यामुळे त्याने आपला जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उडी मारली. त्यामुळे फक्त पायाच्या दुखापतीवर निभावले आहे.
अपघात इतका भीषण होता की जीपमधील प्रवाशांना काढण्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागले. कंटेनर चालक हा अपघात झाल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकामी राहुरी, देवळाली प्रवरा परिसरातील ५ ते ६ रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. बरोबरच साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, माजी सभापती मनिषा अविनाश ओहोळ, चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, रुग्णहक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष निखिल भोसले, प्रविण कातोरे, गोमू ओहोळ, चंद्रकांत थोरात, संकेत कदम, देवळालीचे नगरसेवक आदिनाथ कराळे यांसह गुहा, चिंचोली, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून प्रवरा ग्रामीण रुग्णालय, विवेकानंद नर्सिंग होम, राहुरी ग्रामीण रुग्णालय, तसेच अन्य ठिकाणी हलविण्याकामी मदतकार्य केले. घटनास्थळी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
अंधार झाल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. विविध ठिकाणाहून रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूंनी सुमारे तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री बराच वेळ नगर-मनमाड रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघातातील जागीच मृत्यू झालेल्या पुष्पा जैस्वाल यांचा मृतदेह शवविच्छेदना साठी राहुरी येथे हलविण्यात आला असून त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारपर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याने अन्य मयत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.
0 टिप्पण्या