वीजेची रोहित्रे बंद केल्याने शेतकऱ्यांची कोल्हार महावितरण कार्यालयावर धडक

राहुरी / बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील चिंचोली व परिसरातील शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणने बंद केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत हि रोहित्रे पुर्ववत सुरू करण्यासाठी संतप्त झालेल्या ५० ते ६० शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी महावितरणच्या कोल्हार खुर्द येथील कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना निवेदन देत धारेवर धरले.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी येथील कनिष्ठ अभियंता गाडे यांच्या दालनात ठिय्या मांडत शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या महावितरणची रोहित्रे बंद करुन सक्तीची वसूली धोरण राबविण्याची कंपनीची मोहीम मनमानी स्वरुपाची व बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना वेठीस धरणारी आहे. गत १५ ते २० दिवसापासून परिसरातील अनेक रोहित्रे बंद केल्याने सद्यस्थितीत शेतकरी रब्बीची पिके उभी करण्याच्या विवंचनेत आहे. यात महावितरणच्या या आडमुठ्या धोरणाने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हुकल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना खिंडीत गाठून त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा उठविण्याचा महावितरणकडून चाललेला प्रकार निंदनीय व संताप जनक असून वीज रोहित्र बंद करण्याची बेकायदेशीर मोहीम महावितरणने तात्काळ स्थगित करावी व विद्युत कायदा २००३ च्या तरतुदीनुसार ज्या दिवसापासून रोहित्रे बंद केली आहेत त्या विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रति तास ५० रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, तसेच पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या बाजारभाव मुल्यानुसार नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आगामी आंदोलन तीव्र स्वरुपाचे करण्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान कनिष्ठ अभियंता यांनी या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करत डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन करत तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गागरे, सरपंच गणेश हारदे, सदस्य विलास लाटे, कचेश्वर काळे, सुनील काळे, दत्तात्रय काळे, सचिन लाटे, सुनील लाटे, विजय पठारे, विजय सिनारे, रायभान नलगे, बन्सी भोसले, संदिप काळे, महेश नलगे, सर्जेराव लाटे, राहुल लाटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, गणेश लाटे, भाऊसाहेब ब्राम्हणे, शरद आरगडे, बाबासाहेब गागरे, दिलिप कातोरे, मुरलीधर हारदे सह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या