अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर शहरातील मिरगे वस्ती येथील रहिवासी आणि दी ओरिएंटल इन्शुरन्स कं. शाखा श्रीरामपूर कार्यालयातील शिपाई स्व. प्रभाकर जावळे यांचे सुपुत्र सागर जावळे यांनी भारत सरकार प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून प्रशासकीय अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. सागर जावळे यांच्या नियुक्ती बद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक भरत कुंकुलोळ यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रेडक्रॉस सोसायटीचे सचिव सुनील साळवे यांनी सांगितले की, सागरच्या यशाने श्रीरामपूरचे नाव उज्वल झाले आहे. सागरने अतिशय खडतर परिश्रम व प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत यश संपादन केले. जिद्द असेल तर कुठलेही धेय्य साध्य करता येते, त्यासाठी आत्मविश्वास व इच्छाशक्ती असावी लागते असे सुनील साळवे यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सागर जावळे म्हणाले की, प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. माझ्या यशामध्ये माझे सर्व गुरुजन यांचा सिंहाचा वाटा आहे. कोणतेही पद हे गुरु पेक्षा श्रेष्ठ नाही, आज मी त्यांच्यामुळेच घडलो तसेच आई वडिलांचे कष्ट, त्यांचा आशीर्वाद यामुळेच यश संपादन करू शकलो असल्याचेही ते म्हणाले. तसेच युवकांनी उच्चतम धेय्य गाठण्यासाठी चांगला अभ्यास करावा असे आवाहनही श्री.जावळे यांनी केले. आभार पोपटराव शेळके यांनी मानले.
यावेळी नानासाहेब मुठे, सुधाकर पिलगर, सोपान नन्नावरे, शहबाज शेख, अरुण कटारे, संजय हागवने, नितीन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या