विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील राजाबागसवार दर्ग्याजवळील अरुंद निलाजमकालीन जुनाट पुलावर वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर हा पुल वळण रस्त्यावर आहे. यामुळे याठिकाणी छोटे-मोठे अपघातही वारंवार घडत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत असून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
पैठण औरंगाबाद रस्त्यावर पैठण एमआयडीसी आहे. तसेच बिडकीन येथे नव्याने सुरू होत असलेल्या डिएमआयसी निर्मितीचे काम जोमाने सुरू असून सध्या अंतर्गत रस्ते, वीज, ड्रेनेज आदी कामे सुरू असल्याने या रस्त्यावर अवजड वाहतुकीसह छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच रस्त्यावर ढोरकीन गावात राजाबागसवार दर्ग्याजवळ वळण रस्त्यावर निलामकालीन जुनाट पुल आहे. या वाढत्या वाहतूकीमळे या अरुंद पुलावर सतत छोटे-मोठे अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उस गाळप हंगाम सुरू असल्याने ओव्हरलोड ऊसाच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. दिवसांतून अनेकदा वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हा पुल वळण रस्त्यावर असल्याने अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडत असल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात अनेकदा वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवला. परंतु संबंधित यंत्रणेचे याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट तर बघत नाही ना ! असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या