बाळासाहेब भोर /संगमनेर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्याची संकल्पभूमी असलेल्या पेमगिरीतील दत्त मंदिरात आजपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षी कोरोनाच्या सावटामुळे भव्य दिव्य स्वरूपात सप्ताह करण्यात आला नव्हता. परंतु आता कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने याही वर्षी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
गेली चाळीस वर्षांपासून सुरु असलेला हा भगवान दत्तात्रेयांचा अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे पंचक्रोशीतील भाविकांसाठी मोठी पर्वनीच असते. वै.अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांच्या आशिर्वादाने व वारकरी संप्रदयातील महामेरू गुरुवर्य ह.भ.प. मनोहर महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प. हौशीराम महाराज कोल्हे यांच्या सूत्रसंचालनाखाली हा नामयज्ञ अखंडपणे सुरु आहे. व मनोहर महाराज भोर यांच्या प्रयत्नांमुळेच या ठिकाणी ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, रामकृष्ण महाराज लहवितकर, सुमंत महाराज नलावडे, जगन्नाथ महाराज पवार, पांडुरंग महाराज घुले यांच्यासारख्या नामवंत कीर्तनकरांची कीर्तनसेवा याठिकाणी प्राप्त झाली.
गीता जयंती, दत्त जयंती आणि वै.अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांची पुण्यतिथी असा त्रिवेणी संगम हा या नामज्ञाचा विशेष महिमा आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनसेवा आयोजित केली असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्मदिन याची देही याची डोळा असा खुप भव्यदिव्य स्वरूपात होत असतो. विशेष म्हणजे दत्त मंदिर परीसरातील सर्व तरुण वर्ग हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तन, मन, धनाने या धार्मिक कार्यात सहभागी असतो.
या सप्ताहा ची सांगता दि. 22 डिसेंबर 2021 रोजी ह.भ.प. गुरुवर्य मनोहर महाराज भोर यांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनाने होणार असून पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कीर्तनरुपी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन गुरुदत्त तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या