राहुरी विद्यापीठ : शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे. कृषि पदवीधरांनी नोकरीच्या संधींचा अवश्य विचार करावा, कृषि पदवीधरांना कृषि विभाग, कृषि विद्यापीठे, कृषि क्षेत्राशी निगडित खाजगी कंपन्या, विविध बँका, कृषि क्षेत्रातील संशोधन संस्था, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञ होण्याची संधी आहे.
या बरोबरच राज्यात शालेय शिक्षणात कृषि विषय समाविष्ट केल्याने ते विषय शिकवण्यासाठी कृषि पदवीधरांची आवश्यकता आहे. अशा विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे कृषि क्षेत्रामध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
3 डिसेंबर हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिवस महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयात कृषि शिक्षण दिन ऑनलाईन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे बोलत होते.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, धुळे येथील कृषि उद्योजक जयेश पाटील, निघोज तालुका पारनेर येथील प्रगत शेतकरी राहुल रसाळ व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी जनार्दन बोंतले ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी सचिन सूर्यवंशी, जयेश पाटील, राहुल रसाळ व जनार्दन बोंतले यांनी कृषि पदवीधरांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच राहुरी तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, वक्त्यांची ओळख व कार्यक्रमास उपस्थित असणार्या सर्वांचे स्वागत महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. प्रेरणा भोसले, सौ. अंजली देशपांडे, सौ. वैशाली पोंदे, सौ. ज्योती सासवडे, अमृत सोनवणे व अनिल शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज गुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कीर्ती भांगरे यांनी मानले.
0 टिप्पण्या