अहमदनगर/ जावेद शेख : श्री.गाडगे महाराज आश्रम शाळेत लोकहितवादी, दीनोध्दारक, थोर समाजसेवक, निष्काम कर्मयोगी संत श्री.गाडगेबाबा यांची ६५ वा पुण्यतिथी सोहळा विविध कार्यक्रमांनी व कोरोणा नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला.
राहुरी येथिल आश्रमशाळा स्वतः संत गाडगेबाबांनी १९५४ साली स्थापना केली. या शाळेचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे काम स्व.खांडवे आण्णा यांनी केले. दरवर्षी १३ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असे, दरदिवशी काकडा आरती, प्रवचन व रात्री किर्तन आयोजित केले जायचे. सप्ताह काळात परीसर सफाई, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा इतर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करुन २० डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशे, लेझिम पथकासह राहुरी शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात येत असे. परंतु दोन वर्षापासुन कोरोणाच्या पार्श्वभुमिवर साधेपणाने कार्यक्रम साजरा केला जातो.
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वर्ग, परीसर सफाई करण्यांत आली. सकाळी संतश्रेष्ठ गाडगेबाबांची शाखेच्या संचालिका सौ.भारतीताई खिलारी यांचे हस्ते व दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक यांचे उपस्थितीत विधीवत पुजा होऊन बाबांची सामुदायिक आरती करण्यांत आली. त्यानंतर मातोश्री सखुबाई हॉल येथे शाखेच्या संचालिका सौ.भारतीताई खिलारी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राथ. मुख्याध्यापक श्री. गजानन खर्चे, माध्य. मुख्याध्यापक श्री.मिलींद गुजरे, व प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ सूर्यवंशी, सेवानिवृत्त शिक्षक श्री.हनुमंत आवटे, सेवानिवृत्त अधिक्षक श्री.भानुदास जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.गजानन खर्चे यांनी तर सूत्रसंचलन श्री.किरण पवार यांनी केले.
याप्रसंगी संत गाडगेबाबा व स्व.खांडवे अण्णा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संत बाबांच्या जीवनकार्यावर भाषणे, भजने व विविध गीते सादर केली. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी ह.भ.प.यमुनाबाई महाराज, श्री.सूर्यवंशी, श्री.आवटे, श्री.जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.खिलारी यांनी संत श्री. गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, अधिक्षक, अधिक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. शेवटी श्री.सुदाम दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. "मानवतेच्या थोर सेवका...." या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्वांनी मिष्ठान्न भोजनाचा लाभ घेतला.
0 टिप्पण्या