राहुरी शहर/अशोक मंडलिक : निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी २ हजार कोटी रूपये खर्चाचे नियोजन करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात तनपुरे यांनी म्हटले आहे की निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम मार्च, २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केलेले असून यासाठी आपण वेळोवेळी निधीही उपलब्ध करीत आहेत. सध्या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांची कामेही वेगाने सुरू आहे. एकुण ८.३२ द.ल.घ.फुट क्षमतेच्या या धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी ८५ कि.मी. तर उजव्या कालव्याची लांबी ९७ कि.मी. आहे. हे दोन्हीही कालवे माती व मुरूम भरावाचे असून एवढ्या लांबच्या अंतरावरून पाण्याचे वहन होणार असल्याने यामधून झिरपा व बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन सुमारे ३० ते ४० टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे. यामुळे शेवटच्या भागात उन्हाळी हंगामात पाणी पोहचविणे अवघड होणार आहे. यासाठी या दोन्हीही कालव्यांना सिमेंट कॉक्रीटीचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.
यासाठी सुमारे २ हजार कोटी रूपये अपेक्षीत आहे. सिमेंट कॉक्रीटच्या अस्तरीकरणामुळे प्रत्येक वर्षी करावा लागणारा कालव्याच्या साफसफाईचा खर्चही कमी होणार आहे. उजव्या व डाव्या कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर ही कामे प्राधान्याने हाती घेण्यासाठी यासाठीच्या खर्चाचे नियोजन व त्यासाठी करावी लागणारी २ हजार कोटी रूपयांची आर्थिक तरतूद याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी श्री. तनपुरे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या