सात्रळ महाविद्यालयात वाणिज्य मंडळ उद्घाटन व एक दिवसीय वस्तू व सेवा कर प्रशिक्षण

राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्यावतीने वाणिज्य मंडळ उद्घाटन व एक दिवसीय वस्तू व सेवा कर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर पद्मश्री विखे पा. महाविद्यालय प्रवरानगरचे उपप्राचार्य डॉ. बी.डी. रणपिसे, व संशोधन मार्गदर्शक डॉ. जी.डी. बोर्डे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सात्रळ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डी.एन. घाणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे व्याख्यान डॉ. रणपिसे दिले. त्यांनी वाणिज्य विभागातील विविध रोजगार संधी कोणकोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. देशातील विविध कर पद्धती व वस्तू व सेवा कर या विषयावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. एस.एस.घोलप यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.यामध्ये कु. प्रियंका सांबारे , शुभम डुक्रे, श्वेता शिंदे, या बी.कॉम च्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. पहिल्या सत्राचे आभार प्रदर्शन प्रा. एच.एल. दिवेकर यांनी केले.

दुसऱ्या सत्राकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी.एन.घोलप हे अध्यक्षस्थानी होते. सत्रामध्ये डॉ. बोर्डे यांनी व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये वस्तू व सेवा कराचे प्रकार, वस्तू व सेवा कर नियमावली, वस्तू व सेवा कर आकारणी, वस्तू व सेवा कराचे दर इ. विषयावर व्याख्यान देऊन उदाहरणाद्वारे वस्तू व सेवा कर आकारणी करून दाखवली. या सत्रासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचे आभार प्रा. एस.डी.गोपाळे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सिनगर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा. घाणे, प्रा. दिघे, प्रा. दिवेकर, प्रा. गोपाळे हे उपस्थित होते. सदरच्या उपक्रमात वाणिज्य शाखेतील जवळपास ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या