शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ' यातील डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेला मतितार्थ समजून घ्या-प्रा. शंकरराव अनारसे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मार्मिक आणि सकारात्मक दृष्टीने आपल्याला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा 'हा जीवन प्रगतीचा मार्ग सांगितला, तो मतितार्थ मूलतः समजून घेऊन जीवनमार्ग चालावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी केले.

येथील भूमी फाऊंडेशन सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आणि विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्राचार्य अनारसे बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'ही कविता सादर केली.

यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे, सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ, भूमी फॉउंडेशनचे बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी स्वागत, प्रास्ताविक करून प्रा. कैलास पवार यांनी दिलेला शुभेच्छा संदेश सादर केला आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. सर्व मान्यवरांनी दीपज्योत पेटवून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

प्राचार्य अनारसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेऊन सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी सांगितले होते की सकारात्मकदृष्टी आणि सेवाभाव जपण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्यावे. आपल्या अवतीभवतीच्या समाजाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी संघटित व्हा आणि आपले जीवन देशभक्ती आणि ज्ञानशक्ती वाढविण्यासाठी संघर्ष करा 'हे सूत्र आज प्रकर्षाने दिसत नाही. माणसाच्या पशुवत जीवनाला बाबासाहेबांनी माणुसकीचा अर्थ आणि आकार दिला. त्यांनी ब्रिटिश लायब्ररीतील सर्व पुस्तके वाचली होती, दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी चळवळी केल्या, लाखो ग्रन्थ वाचून जगातील सर्वात श्रेष्ठ अशी राज्यघटना भारताला दिली. स्वतःसाठी त्यांनी काहीच साठविले नाही की राजकरणही केले नाही. त्यांची वाणी बुद्धासारखी निर्मळ, सेवाभावी, विवेकशील, विज्ञाननिष्ठ आणि संयमी स्वरूपाची होती, हा आदर्श समाजात दिसला पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी सांगितले की, दीप ज्योतीबरोबर आपल्या मनातील आत्मज्योत प्रकाशित ठेवणे हीच खरी डॉ.आंबेडकरांना मानवंदना होय. प्रा.बारगळ यांनी बाबासाहेबांना आपल्या प्रत्येक कृतीत आठवणे ही खरी पूजा होय. सुखदेव सुकळे म्हणाले, आपण ज्या स्थानी आहोत आणि सुखाचा घास घेत आहोत तेथे बाबासाहेब दिसले पाहिजे, तर अध्यक्ष भाषणात प्राचार्य शेळके यांनी भूमी फाऊंडेशन, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.

ही सर्व मित्रमंडळी कष्ट आणि परिश्रमातून शिकली आहेत, म्हणूनच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूजनीय आणि संस्कारशील नात्याने आपले वाटतात असे सांगून अर्थतज्ञ म्हणून असलेले बाबासाहेब यांचे योगदान स्पष्ट केले. बाबासाहेब चेडे म्हणाले, माझे नावही बाबासाहेब आहे, याबद्दल मला सार्थ गौरव वाटतो, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची थोरवी फार मोठी असल्याचे सांगून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या