अहमदनगर/जावेद शेख : लॉकडाऊनमुळे साई मंदिर बंद असल्याने साई प्रसादालय व लाडू प्रसाद वितरण बंद करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी साईमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असले तरी साई प्रसादालय व लाडू प्रसाद मात्र बंदच होते.
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते पाटील यांनी साई प्रसादालय सुरू व्हावे यासाठी आमरण उपोषण केले आणि त्यांची मागणी मान्य करत प्रसादालय सुरू करण्यात आले. परंतु शिर्डीत आलेला साईभक्त हा प्रसाद रुपी लाडू घेतो आणि गावी गेल्यानंतर मोठ्या भक्तीभावाने इतरांना देखील प्रसादरुपी वाटत असतो, परंतु साईबाबा संस्थानने लाडू प्रसाद लवकर न सुरू केल्याने शिर्डीतील काही व्यावसायिकांनी नवी शक्कल लढवत हुबेहूब साईबाबा संस्थान सारखे लाडू बनवले आणि तशीच पॅकिंग करून ते शिर्डीतील दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवले, परंतु या लाडूची गुणवत्ता चांगली नव्हती मात्र संस्थानचे लाडू बंद असल्याने नाईलाजास्तव हे गुणवत्ता नसलेले लाडू साईभक्त घेत होते.
आजपासून साईबाबा संस्थानने लाडू प्रसादाचे एक काऊंटर द्वारकामाई मंदिरासमोर नाट्यगृह येथे सुरू केल्याने साई भक्तांनी याठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. भाविकांमध्ये या लाडू प्रसादाच्या सुरू होण्याने साई भक्तांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पहायावयास मिळाले.
२५ रुपये प्रति पाकीट असलेल्या लाडूचे एका भाविकाला २ लाडू पाकीटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र काही भाविक अतिरिक्त पाकिटे मागत असल्याने कर्मचारी आणि भाविकांमध्ये शाब्दिक चकमकी उडत असल्याचे दिसून येत आहे. भाविकांना जास्त प्रमाणात लाडू उपलब्ध करावे अशी अपेक्षा भाविकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे. उद्यापासून सर्वच काऊंटर सुरू होण्याची शक्यता असल्याने जास्त प्रमाणात भाविकांना लाडू मिळतील असा अंदाज काहींकडून व्यक्त केला जात आहे. बहुप्रतिक्षित संस्थानचे लाडू प्रसाद काऊंटर सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये समाधानी वातावरण निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.
0 टिप्पण्या