अहमदनगर/ जावेद शेख : आरडगावामध्ये जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी क्षार युक्त जमिनी कशा प्रकारे क्षार मुक्त केल्या पाहिजे या संदर्भात खूप मौल्यवान माहिती शेतकरी बांधवांना दिली.
शेतकरी बांधवांनो आज मितिला आपल्या जमिनीतून निघणारे उत्पन्न अतिशय कमी झालेले आहे. त्याचे कारण आपण जमिनीचे माती परीक्षण करत नाहीत, त्यामुळे आपल्याला जमिनीचा पोत कळत नाही, मातीतील घटक किती प्रमाणात आहेत हे कळत नाही. आणि हे न कळल्यामुळे आपण रासायनिक खतांचा व कीटक नाशकांचा प्रमाणात योग्य मात्रेने वापर करत नाहीत.
आज आपल्या तालुक्यात 14 हजार हेक्टर ऊस असून त्याद्वारे फक्त 11 लाख टन ऊस उत्पादन होणार आहे. याचा अर्थ सरासरी 30 टन एकरी उत्पादन मिळणार आहे, याप्रमाणेच इतर पिकांचे देखील तसेच झालेले आहे. एकरी उत्पादन वाढवायचे असेल तर माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माती परीक्षण विभागात जाऊन माती परीक्षण करून घ्यावे व ही एक चळवळ बनवावी.
मातीचा नमुना कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन रितू ठाकरे मॅडम यांनी सविस्तर पणे शेतकरी बांधवांना केले.
या कार्यक्रम प्रसंगी मृद शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे यांचे भाषण झाले. कार्यक्रम प्रसंगी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ, कृषी सहाय्यक भारत हरिश्चंद्रे, प्रसाद आढाव सह मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागातील विद्यार्थीनी नेहा नवनागे, उत्कर्षा देशमुख, पायल महादूले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या