मानोरी येथे सराफाचे दुकान फोडून दागिन्यांची चोरी

आरडगांव/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील एका सराफाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे सोळा हजार रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अधिक समजलेली माहिती अशी की, मानोरी येथील राहुरी- मांजरी रस्त्याच्या लगत असलेल्या रेणुका माता शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील अनिल डहाळे यांचे सौभाग्य अलंकार या दुकानाचे आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी टामीच्या साह्याने शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील अंदाजे सोळा हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचा किरकोळ दागिण्यावर डल्ला मारला.

सकाळी ही माहिती ग्रामस्थांना समजताच याठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली. पोलिस पाटील भाऊराव आढाव यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या ठिकाणी पो.हेड. महेंद्र गुंजाळ यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे. राहुरी शहरासह तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीसांनी गस्त सुरू करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या