पत्रकार राजमोहंमद शेख राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

राहुरी / बाळकृष्ण भोसले - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेने सन २०२१ चा राज्यस्तरीय 'आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार' कोल्हार भगवतीपूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद शेख यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार राजमोहंमद करीम शेख हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. शिव, फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार तसेच अनाथ व निराधार बालकांसाठीचे त्यांचे कार्य अतुलनीय राहिले आहे तर रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. आजवर त्यांनी हजारो आजारी, निराधार व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळून देण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे तर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा प्रयत्न सदोदित प्रेरणादायी राहिला आहे.

या त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवरील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ने घेतली असून त्यांच्या या कार्याबद्दल २० डिसेंबर २०२१ रोजी नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज मोहम्मद शेख यांना राज्यस्तरीय गुणीजन गौरव सोहळ्यात आदर्श कार्यगौरव समाजरत्न देवून सन्मानित करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रमेश आव्हाड यांचे अध्यक्षतेखाली व ह.भ.प.मा.श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख यांना समारंभपूर्वक हा सन्मान प्रदान करण्यात आला.

प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री विजयकुमार इंगळे, मानवधन शैक्षणिक संस्थेचे श्री प्रकाश कोल्हे, मिनाक्षी गवळी- जगदाळे, श्री.प्रकाश सावंत, सौ.मनिषा कदम - घार्गे, असिफ अली सय्यद, (मुंबई), इदरिस शेख, मुख्तार हकिम, शहेबाज पठाण, उपस्थिती होते. शेख यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या