श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संस्कृती आणि आदर्श मानवी जीवनमूल्यांना जपत आपले जीवन घडविले, त्यांच्या समर्पित जीवनाचा आदर्श राजकीय, सामाजिक, साहित्यिक, आर्थिकक्षेत्रासह सर्वानी घ्यावा असे आवाहन श्री गजाजन महाराज महाविद्यालय, मुकुटबन ता. झरी जि. यवतमाळ येथील प्रोफेसर तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. अनंता सूर यांनी केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. अनंता सूर यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य जीवन ' याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ. सूर बोलत होते. प्रमुख पाहुणे फकिरा वाघमारे, डॉ रामकृष्ण जगताप तर अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव उपाध्ये होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशभक्ती आणि संविधानविषयी मनोगत व्यक्त केले. सौ.मंदाकिनी उपाध्ये, सौ. सुनंदाताई वाघमारे, सौ.आरती उपाध्ये, सौ.गायत्री सूर, कु.स्वरांगी सूर, स्वरांग सूर, निर्मिक उपाध्ये आदी उपस्थित होते.
डॉ.रामकृष्ण जगताप, फकिरा वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून असे महापुरुष हीच खरी आपली श्रीमंती आणि मानसिक शक्ती असल्याचे सांगितले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी भावना व्यक्त केल्या, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर कुणी विचारले असते आम्हाला? त्यांनीच दाखविला शिक्षणाचा सूर्य आणि नीतीचा जीवनमंत्र !"असे सांगून काव्यात्म अभिवादन केले. सौ.आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0 टिप्पण्या