विलास लाटे/पैठण : मोटर सायकल चोरीचा आरोप असलेल्या युवकाला अटक करण्यासाठी आल्याच्या भीतीमुळे वडिलांनी प्राण सोडल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी येथे मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून या घटनेने परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेत स्वत: लक्ष ठेवून आहेत.
अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये एका मोटर सायकल चोरीतील प्रमुख आरोपीने तारु पिंपळवाडी येथील एका युवकाचे या गुन्ह्यात सहभाग असल्याचे नाव सांगितल्याने मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि भागवत नागरगोजे, पो.काॅ.चव्हाण हे आपल्या पथकासह सदरील युवकाला अटक करण्यासाठी मध्यरात्री अचानक आल्यामुळे, पोलीस आपल्या मुलाला अटक करून घेऊन जातील या भीतीपोटी संशयित आरोपी बिलाल शेखचे वडील शेख शब्बीर शेख इब्राहिम (वय ६०) यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे गावामध्ये नातेवाईकांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान मयत शब्बीरभाई यांचा मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात मयताच्या नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान रात्री-अपरात्री चौकशीच्या नावाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने ज्येष्ठ नागरिकाला धमकी व धक्काबुक्की केल्यामुळे घटना घडल्याचा आरोप करून संबंधित पोलिसाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाइकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्याकडे केली आहे. तात्काळ संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा निर्णय संतप्त नातेवाईकांनी घेत, गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर अंत्यविधी करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरीष्ठांच्या आश्र्वसनानंतर अंत्यविधी करण्यात आला.
या घटनेची खबर मिळताच पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, बिडकीन चे सपोनि संतोष माने, वरिष्ठ उपनिरीक्षक छोटू सिंग गिरासे, चौरे, सोनवणे, सचिन भूमे आदींनी घटनास्थळी धाव घेत परीस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
0 टिप्पण्या