श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील माधव पवार वस्ती व परिसरात बिबट्या व त्याचे बछड्याचे वास्तव्य वारंवार दिसत असून अनेक वेळा लोकप्रतिनिधी व वनखात्याचे अधिकारी कर्मचारी यांना कळविले तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तेथील रहिवासी रवींद्र पवार यांनी केली.
याकडे वनखात्याचे दुर्लक्ष होत असून शिरसगाव हद्दीतच असलेल्या प्रगतीनगर येथील वनखात्याच्या कर्मचारी यांना कळविले तरी गांभीर्यानं लक्ष दिले जात नाही. एखादे वेळेस मनुष्यहानी झाल्याचे निदर्शनास आल्यावर वनखात्याला जाग येईल असे दिसते. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित का केले जात नाही हा प्रश्न शिरसगाव ग्रामस्थ करीत आहेत.
शुक्रवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर बिबट्याने एका कालवडीवर हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही हे दुर्दैव. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा अशी मागणी असताना पिंजरा लावल्या जात नाही. पिंजरा लावला असे दर्शवायचे. इतर ठिकाणी मागणी आली की हाच उचलायचा तिकडे न्यायचा त्यामुळे दहशत ही कायमची वर्ष दोन वर्षापासून आहे.
आता शाळा सुरु झाल्या, शेतकरी शेतात जायला घाबरतात, कामगार येत नाहीत, कामावर जाण्यास भीती वाटते, पहाटे कामावर जायचे तर भीतीने काम सोडावे लागते. एखाद्या आंब्याखाली बिबट्या बसलेला दिसतो, असे असताना कोणी गांभीर्याने दखलच घेत नाही. याकडे पालकमंत्री, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनी लक्ष घातल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, दहशत भीती दूर होईल. यासाठी संबंधिताना सूचना द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
0 टिप्पण्या