लोकशाही बळकट होण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे- सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे

अहमदनगर/ जावेद शेख : लोकशाहीमध्ये चांगले प्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे व आपले कर्तव्य पार पाडावे. लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकीविषयी जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता जनजागृती ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉ. अहिरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. शेख म्हणाले की संपूर्ण जगात भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. या देशांमध्ये कोणत्याही हिंसाचाराशिवाय सत्ता परिवर्तन होते. त्यामुळे भारत देशाचा आपणा सर्वांना गर्व आहे. निवडणूक जनजागृती कार्यक्रम निवडणूक साक्षरता मंडळाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शेख यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिये विषयी अत्यंत महत्वाची तपशीलवार माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाचा उद्देश व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी डॉ. मनोज गुड यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती भांगरे यांनी केले. महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चारुदत्त चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या डॉ. प्रेरणा भोसले, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या