राहुरी शहर/ अशोक मंडलिक : चाळीस वर्ष मालपाणी घराण्याचे राहुरी खुर्द गावासाठी योगदान काय असे विचारणाऱ्या सत्ताधारी राजकीय विरोधकांना प्रभाग 3 मधील मतदारांनी त्यांना त्यांची जागा मतदान रुपी आशीर्वादाने दाखवुन द्यावी असे नम्र आवाहन जनसेवा मंडळाच्या उमेदवार अश्विनी कुमावत यांनी काल झालेल्या प्रचार सांगता सभे प्रसंगी व्यक्त केले.
पै. पुंजा आघाव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामदैवत मारुती मंदिर प्रांगणात पार पडलेल्या सांगता सभेच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शब्बीरभाई देशमुख, ज्येष्ठ नेते गेणूभाऊ तोडमल, मधुकर साळवे, प्रदिप पवार, भवर साहेब, अफजल पठाण, पप्पूशेठ मालपाणी, अयुबभाई पठाण, रफिकभाई शेख, अशोक मंडलिक, मंगल शेडगे, आशाबाई नजन, राम तोडमल, आसफ पठाण, भाऊसाहेब मनतोडे, साहेबराव माळी आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की स्व. माझ्या आई मालपाणी ताई यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे राहुरी खुर्द गावच्या विकासासाठी खर्ची घातले. ग्रांमस्थां बरोबर कधीहि दुजा भाव केला नाहि. त्यांना राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्य पातळीपर्यंत काम करण्याची संधी मिळाली. त्याचा सर्व उपयोग गावच्या विकासासाठी खर्ची घातला. परंतु त्यांनी आपला कधी ही बडेजाव न करता सर्व श्रेय राहुरी खुर्द ग्रामस्थांना दिले. गावातील सत्ताधारी राजकीय विरोधक हे विचारतात की निर्मलाताई मालपाणी यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे गावासाठी योगदान काय आहे. आम्ही त्यांच्यासमोर ही निवडणूक बिन विरोध होण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु राजकीय पोटशूळ उठल्यामुळे त्यांना मान्य झाले नाही. त्यांनी आमच्यावर दुःखाचा प्रसंग असून देखील ही पोट निवडणूक लादली, हि मोठी खेदाची बाब आहेे.
प्रभाग 3 मधील मतदारांनीच हि निवडणूक हातात घेऊन त्यांना धडा शिकवण्याचा ध्यास घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे प्रभागातील सर्व मतदार बंधु- भगिनींचे आशिर्वाद व स्व.आईंचे आशिर्वाद हेच माझ्या विजयाचे शिल्पकार ठरणार आहेे. गावातील जेष्ठ नेत्यांनी व सर्व ग्रामस्थांनी या निवडणुकीत आमच्या कुटुंबावर दाखवलेला विश्वास याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या पुढेही देखील राहुरी खुर्द गावच्या विकासासाठी मालपाणी व कुमावत कुटुंबीयांचे योगदान कायम राहील अशी ग्वाही दिली. या सभेला प्रभागातील मतदार बंधू भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार पोपट चोपडे यांनी मानले.
0 टिप्पण्या