टवाळखोर रायडर्सचा बंदोबस्त करा; अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल... राहुरी पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट

देवळाली प्रवरा ( राजेंद्र उंडे ) : सर्वसामान्‍य नागरीकांना पोलीस धाक दाखवतात, परंतु  टवाळखोर  रायडर्स  तरुण पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय या समोरुन दुचाकी चालवून कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न व सायलेन्‍सरचे विविध विचित्र आवाज उडविण्‍याच्‍या प्रकारामुळे सर्वसामान्‍य नागरीक अक्षरश: त्रासले आहे. त्‍याच बरोबर टवाळखोर रायडर्स विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थीनींची छेड करण्‍याचे प्रकार दिवसेदिवस वाढ होत असून पोलीसांसमोर विद्यार्थीनींची छेड काढली जात असतांनाही पोलीस मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून बघण्‍याची भूमिका केली जात आहे.  यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था सांभाळणा-या पोलीसांवरचा सर्वसामान्‍य व्‍यक्‍तींचा विश्‍वास उडाला आहे.

कायदा व सुव्‍यवस्‍थेचा पोलीस नेहमीच सर्वसामान्‍यांना धाक दाखवितात, परंतु शहरातील टवाळखोर रायडर्सला मात्र पोलीसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. टवाळखोर रायडर्स विरुध्‍द पोलीसांकडे तक्रार केली असता पोलीसच तक्रारदात्‍याला कशाला त्‍याचा नादी लागता, तो उद्या तुमच्‍या मुलीची छेड काढील किंवा पळवुन नेईल असे पोलीसच सांगत असल्‍याने तक्रारदाता त्‍या टवाळखोर रायडर्सविरुध्‍द तक्रार दाखल करीत नाही. टवाळखोर रायडर्स महागडया दुचाकी सुसाट वेगाने पळवितात, या दुचाकीच्‍या सायलेन्‍सरमध्‍ये फेरफार करुन व कर्णकर्कश हॉर्न वाजवुन त्‍या आवाजाने नागरीकांसह विद्यार्थीनीमध्‍ये भीती निर्माण झाली आहे.  शाळा, महाविद्यालय भरण्‍याच्‍या वेळी व दुपार, सायंकाळी सुटण्‍याच्‍या वेळी टवाळखोर रायडर्स शाळा, महाविद्यालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर आपल्‍या महागडया दुचाक्‍या घेऊन येत फटाक्‍यासारखा, विचित्र आवाज सायलेन्‍सरमधून आवाज करतात. त्‍याचप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न वाजवून विद्यार्थी व विद्यार्थींना कानावर हात ठेवण्‍यास भाग पाडतात. शाळा, महाविद्यालय भरण्‍याच्‍या व सुटण्‍याच्‍या वेळी सुसाट वेगाने चकरा मारणे, या चकरा मारीत असतांना लहान-मोठे अपघातही झालेले आहे. पोलीस मात्र गुन्‍हयांची संख्‍या वाढू नये म्‍हणून अपघात व इतर तक्रारी वजा गुन्‍हे दाखल करण्‍याचे टाळाटाळ करतात.

रात्री अपरात्री अनेक रस्‍त्‍यांवरुन टवाळखोर रायडर्सच्‍या दुचाक्‍या सुसाट वेगाने कर्णकर्कश हॉर्नचे आवाज व विचित्र सायलेन्‍सरचे आवाज काढीत शहरातून फेरफटका मारतात. देवळाली प्रवरा सायंकाळी सात ते रात्री साडेदहा अकरा वाजेपर्यत जेवणानंतर अनेक महिला घरच्‍यांसोबत शतपावली करण्‍यासाठी येतात. त्‍यावेळी टवाळखोर रायडर्स महिलांना खेटून गाडी नेत कर्णकर्कश हॉर्न वाजवून महिलांना दचकविण्‍याचा प्रकार वारंवार होत आहे. टवाळखोर रायडर्स सायलेन्‍सरमध्‍ये बदल करुन आवाजाचा बार, विचित्र आवाज करणारे सायलेन्‍सर दुचाकीला बसवितात. या विचित्र आवाजामुळे नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे.  शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात ध्‍वनी प्रदुषण आणि स्‍टंटबाजीची जणू स्‍पर्धाच सुरु असते. शहरातील दोनही महाविद्यालय सुरु झालेली असून येथे येणा-या विद्यार्थी व विद्यार्थींनी, पालकांना या टवाळखोर रायडर्सचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

फॅन्‍सी नंबरप्‍लेट, कर्णकर्कश हॉर्न, विचित्र आवाजाचे सायलेन्‍सर या दुचाकींच्‍या विरोधात कारवाई करण्‍याची मोहिम जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हाती घेतली होती. परंतु केवळ नाका बंदीच्‍या वेळी वाहनचालकांवर दंडात्‍मक कारवाई करुन सोडून दिले जाते. दिवसा मात्र मोठा आवाज करणारी वाहने शाळा, महाविद्यालय परिसरात राजरोसपणे फिरतांना दिसत असतांनाही पोलीस मात्र त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करीत नाही. उलट पोलीस या दुचाकींवर कारवाई करण्‍याचे अधिकार आम्‍हाला नसून उपप्रादेशिक परिवहन अधिका-याला आहे असे सांगून स्‍वत:ची जबाबदारी टाळली जात असल्‍याची तक्रार सर्वसामान्‍य नागरीक करीत आहे.

दुचाकीच्‍या वाहनाला नियमानुसार मुळ रचनेत कोणत्‍याही प्रकारचा फेरफार वाहनधारकाला करता येत नाही. तसा बदल करावयाचा असेल तर त्‍यासाठी प्रादेशिक परिवहन अधिका-याची परवानगी घ्‍यावी लागते. मात्र हे सर्व नियम धाब्‍यावर बसवून हॉर्न व सायलेन्‍सरमध्‍ये परस्‍पर फेरफार करत वाहन धारकांकडून फटाका फुटतो तसा कर्कश आवाज निर्माण केला जातो. देवळाली प्रवरात हा सर्व प्रकार पोलीसांसमक्ष घडत असतांना देखील पोलीस मात्र अशा वाहन धारकाविरोधात कोणतीही कारवाई करीत नाही, हे मात्र नवलच आहे. याबाबत चौकशी केली असता टवाळखोर रायडर्सची झंझट नको म्‍हणून पोलीस कारवाई करण्‍यास धजावत नाही. पोलीसच जर टवाळखोर रायडर्स यांना घाबरत असेल तर सर्वसामान्‍य नागरीकांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न सर्वसामान्‍य नागरीकांतून व्‍यक्‍त केला जात आहे.

कायदा हातात घेण्यास लावू नका- डॉ पाटील 
      सर्वसामान्‍य नागरीकांना दुचाकीचे हॉर्न व सायलेन्‍सरच्‍या आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्‍येक दुचाकी धारकाने घेतली पाहिजे. टवाळखोर रायडर्स जाणीवपुर्वक दुचाकीमध्‍ये फेरफार करुन विविध प्रकारचे आवाज काढीत असेल तर अशा रायडर्सविरुध्‍द पोलीसांनी नियमानुसार कारवाई केली पाहिजे. टवाळखोर रायडर्स मुलींना कट मारीत असताना समजुन सांगितले असता ते उलटअर्थी बोलतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या टवाळ खोरांच्या तोंडी लागत नाही. पोलिस उघड्या डोळ्याने पाहुणही कारवाई करत नाही. पोलिसांनी सर्वसामान्य नागरीकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये.
_ डॉ. विश्वास पाटील ; माजी नगरसेवक, अध्यक्ष बाबुराव पाटील याञा उत्सव कमिटी, उपाध्यक्ष व्यापारी संघटना, देवळाली प्रवरा

शाळेच्या परीसरात पोलिसांची गस्त सुरु करणार - पो.नि.राजेंद्र इंगळे
     शाळा, महाविद्यालय व शहरात दुचाकीचे विचित्र हॉर्न व विविध आवाजाचे सायलेन्‍सर बसविणा-या रायडर्सविरुध्‍द तक्रार दाखल करा, निश्चित कारवाई केली जाईल.  शाळा, महाविद्यालय भरण्‍याच्‍या व सुटण्‍याच्‍या वेळी टारगट तरुणांकडून विद्यार्थींनीची छेडछाड थांबविण्‍यासाठी पोलीसांची गस्त सुरु केली जाणार आहे.  जर पोलीस त्‍या वेळेस उपस्थित राहात नसेल तर त्‍यांच्‍या विरोधातही तोंडी तक्रार करा, त्‍या पोलीसांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल.
_ राजेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक, राहुरी

पोलीसांनी गस्‍त घालुन कायदेशिर कारवाई करावी - वाळुंज
     शाळा व महाविद्यालयाच्‍या परिसरात मोठा कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. शाळा सुटल्यानंतर मुलींचा पाठलाग करणे, कट मारणे आदी प्रकार वाढले आहे. त्‍याचप्रमाणे सायंकाळी शतपावली करणा-या महिला व तरुणींना त्रास होईल अशा पध्‍दतीने दुचाकी चालविणे हे थांबविण्‍यासाठी पोलीसांनी या ठिकाणी गस्‍त घालून अशा वाहन चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र पोलीसांच्‍या डोळयासमोर हा प्रकार सुरु असतांनाही कोणतीही कारवाई होत नाही.
_ सतिष वाळुंज, अध्यक्ष, व्यापारी संघटना,देवळाली प्रवरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या