शाश्वत शेती व माती व्यवस्थापनासाठी कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

अहमदनगर /जावेद शेख : शेतकर्यांना वातावरणातील बदलाचा अंदाज वेळेवर मिळाल्यास ते सतर्क होऊन पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टळु शकते. सध्या हवामानातील होत असलेले अनपेक्षीत बदल व त्याचा शेती व शेतकर्यांच्या जीवनावर होत असलेला विपरीत परिणाम लक्षात घेतला तर शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

प्रोसॉईल प्रकल्पांतर्गत जी.आय.झेड. या संस्थेकडून एन.आय.सी.ई.एस.एस.एम. ही प्रणाली महात्मा फुले कृषि विद्यापीठास हस्तांतरीत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन महाबळेश्वर येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणुन कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नैसर्गिक संशाधने व्यवस्थापन आणि कृषि पर्यावरण तसेच प्रोसॉईल प्रकल्पाचे संचालक डॉ. राजीव अहल होते.

यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, मॅनेज हैद्राबादचे संचालक डॉ. बालसुब्रमणी, सहसंचालक डॉ. जी. भास्कर, प्रोसॉईल प्रकल्पाचे वरिष्ठ सल्लागार नविन होरो, सल्लागार विवेक ॠषि, तांत्रिक सल्लागार हिमांशु वर्मा, प्रादेशिक व्यवस्थापक रंजीत जाधव, प्रोसॉईल प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार व प्रोसॉईल प्रकल्पाचे सल्लागार व समन्वयक विश्वंभर राणे (मॅनेज हैद्राबाद) उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की प्रोसॉईल प्रकल्पांतर्गत वातावरण बदलाला तोंड देण्यासाठी  एन.आय.सी.ई.एस.एस.एम. ही ऑनलाईन प्रणाली शेतकर्यांना मागील दोन वर्षांपासून वरदान ठरत आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्यांना सद्यस्थितीच्या व भविष्यातील संभाव्य वातावरण बदलानुरुप विषयांवर वेळोवेळी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. शेतकर्यांनी उत्पादन वाढविण्याबरोबरच मातीच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवे व त्यासाठी शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यावेळी प्रोसॉईल प्रकल्पांतर्गत जी.आय.झेड संस्था व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी डॉ. शरद गडाख म्हणाले की हा करार झाल्यामुळे शेती तंत्रज्ञान वेगाने शेतकर्यांच्या दारात पोहचण्यास मदत होईल. यावेळी डॉ. प्रमोद रसाळ व डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. बालसुब्रमनी, नविन होरो, डॉ. जी. भास्कर व हिमांशु वर्मा यांनी एन.आय.सी.ई.एस.एस.एम. या प्रणालीविषयी विविध मुद्यांवर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीत जाधव यांनी केले तर आभार जितेंद्र यादव व विवेक ॠषि यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुमित कश्यप यांनी समन्वयक म्हणुन काम पाहिले. या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच कृषि विज्ञान केंदे धुळे, दहेगावनेचे विषय विशेषज्ञ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या