राहुरीत शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; आंदोलक जखमी

राहुरी : शेती पंपाचे रोहित्र बंद करून चालू असलेल्या सक्तीच्या वीज बिल विरोधात राहुरी बाजार समितीसमोर शांततेच्या मार्गाने सुरू असलेले रास्तारोको आंदोलन ऊर्जामंत्री ना. तनपुरेंच्या ईशार्याने चिरडण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अचानक प्रहारच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने अचानक झालेल्या या कारवाईने एकच पळापळ उडाली. आंदोलकांची उचलबांगडी केल्याने आंदोलक जखमी झाले. दुपारी उशिरापर्यंत आंदोलकांची धरपकड सुरू असुन गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

सुरेश लांबे यांनी गेल्या ८ महिन्यापासून वेळोवेळी निवेदने व आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या शेती पंपाची सक्तीची बीज बील वसुली चालू आहे. शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांवर सक्तीची वीजबिल वसुली करून अन्याय करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी निवडुन दिले त्यांच्या अडचणी सोडवण्याचे सोडुन ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे हे उलट महावितरण अधिकाऱ्यांना वसुलीचे आदेश देऊन रोहीत्र बंद करत आहेत. ना. तनपुरे यांनी हे थांबवुन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा घणाघाती प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार जर गंभीर्याने विचार करत नसेल तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात गंभीर पावले उचलणार असल्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी शेती वीज पंपाची होत असलेली सक्तीची वीजबिल वसुली शासनाने तात्काळ थांबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना द्यावे व शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बील माफ करावे, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांची बेकायदेशीर वीज तोडणी चालू आहे, त्यासाठी आम्ही शांततेने रस्ता रोको आंदोलन करत होतो. परंतु दडपशाही करून आम्हास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या सांगण्यावरून आम्हास अटक केली आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.
 _ सुरेश लांबे ( तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष )

   आज लोकशाहीची हत्या झाली आहे. मी एक माजी सैनिक आहे. माझ्यावर पोलिसांनी हात उचलला आहे. शेतकऱ्यांची जी वीज कनेक्शन कट केले जात आहे त्या विरोधात आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. या ठिकाणी हुकूमशाही चालू आहे. जिथे अन्याय तेथे प्रहार करण्याचे काम आम्ही बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून करणार आहे. आम्ही बाहेर येऊन देखील शांत बसणार नाही.
 _ विनोदसिंग परदेशी ( जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष )

गुरुवारी दुपारी राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, पप्पूशेठ येवले, नितीन पानसरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, आरपीआयचे बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास साळवे, लहानु तमनर, नामदेव पवार आदींना आंदोलन सुरू असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी फौजफाट्यासह ताब्यात घेतले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व मधुकर शिंदे यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान अचानक झालेल्या कारवाईने या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या