विविध गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद


विलास लाटे/पैठण : चोरी, दरोडे अशा विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे सराईत फरार असलेले आरोपी विकास बाबासाहेब म्हस्के व संजय भानुदास वंजारे यांच्या नुकत्याच पैठण एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफिने पुणे येथून मुसक्या आवळून गजाआड केले.

पैठण एमआयडीसी परिसरात चोरी, मारहाण अशा विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करुन दहशत माजवणारे व पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल असलेले फरार आरोपी विकास म्हस्के (वय ३१,रा.आखातवाडा ता.पैठण) व संजय वंजारे (वय ५१, रा.बडेचे वडगाव ता.पैठण) हे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होते. अखेर पैठण एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, गणेश खंडागळे, पोलीस अंमलदार मिलिंद घाटेश्वर यांनी केली आहे. या कामगिरीबद्दल पैठण एमआयडीसी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या