शेतकर्यांनी कमी किंमतीतील शेडनेट तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- फलोत्पादन संचालक कैलास मोते

राहुरी शहर/अशोक मंडलिक : सद्यस्थितीत शेतीवर हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असून याचा कमी अधिक परिणाम शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होताना दिसत आहे. अशा बदलत्या हवामानात नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हे सर्वात मोठे आव्हान शेतकर्यांसमोर आहे. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान हा एक उपाय ठरु शकतो. अशा शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी कमी किमतीतील विविध संरक्षीत तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान हे एक आहे. भाजीपाला आणि मसाला पिकांची लागवड कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या शेडनेट तंत्रज्ञानाच्या अवलंबनाविषयी शेतकर्यांना जागरुक करावे व त्याच्या अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून विविध प्रयोगशाळांची पाहणी‌ कैलास मोते यांनी केली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी विलास नलगे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ.मुकुंद शिंदे, जलसिंचन व निचरा विभागाचे प्रमुख डॉ. एन. एन. फिरके, राहुरीचे तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे व अहमदनगर येथील उद्योजक इंजि. संदिप डेरे उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या विविध डिजीटल तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. गिरीष भणगे व इंजि. योगेश दिघे यांनी ड्रोन व रोबोटिक्स प्रयोगशाळेबद्दल माहिती दिली.ऑटो पी. आय. एस. आणि स्वयंचलीत पंप प्रणाली या विषयीची माहिती डॉ. मंगल पाटील, इंजि.श्रध्दा वराळे, डॉ. प्रज्ञा जाधव व डॉ.अंजली मुसमाडे यांनी दिली. डॉ. चैतन्य पांडे व डॉ. जे. राजेश यांनी हायपर स्पेक्ट्रलर प्रयोग शाळेविषयी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या