राहुरी / बाळकृष्ण भोसले : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेचा सन २०२१ चा राज्यस्तरीय 'आदर्श कार्यगौरव समाजरत्न' पुरस्कार कोल्हार येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमहंमद शेख यांना जाहीर झाला आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद करीम शेख हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार तसेच अनाथ व निराधार बालकांसाठी ते तारणहार राहिले आहेत तर आजारी रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. आजवर त्यांनी हजारो आजारी निराधार व गरिब रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे तर गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा प्रयत्न सदोदित प्रेरणादायी राहिला आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी माणसांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदरमोड करून आधार देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले असल्याने त्यांचेकडे नेहमीच गरजूंचा राबता वाढला आहे.
या त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवरील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने घेतली असून त्यांच्या या कार्याबद्दल सन २०२१ च्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव सोहळ्यात त्यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी नाशिक येथे पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार राजमोहंमद शेख यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ कृष्णाजी जगदाळे यांनी शेख यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शेख यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या