राहुरी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची किमया! १० एकरांत १५४ टन डाळिंब उत्पादन; तब्बल २.७८ कोटींचे उत्पन्न


इंदापूर तालुक्यातील शेळगावच्या बापूसाहेब दुधाळ यांची उल्लेखनीय कामगिरी; कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्याकडून कौतुक

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने विकसित केलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब केल्यास शेतीत उत्पादनवाढीसोबतच आर्थिक समृद्धी साधता येते, याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे आला. प्रगतशील शेतकरी बापूसाहेब दुधाळ यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून १० एकर क्षेत्रातून तब्बल १५४ टन डाळिंब उत्पादन घेत २.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी शेळगाव येथील डाळिंब व पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासकीय कृषी महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, अखिल भारतीय कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड, तसेच पीक लागवड खर्चाचा अंदाज या योजनेचे कृषी सहाय्यक काकड व गोसावी उपस्थित होते.

दुधाळ यांच्या डाळिंब बागेची पाहणी करताना त्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मिळविलेल्या उत्पादनाची माहिती दिली. सुमारे ७ लाख रुपये एकरी खर्च करून १० एकरांत १५४ टन डाळिंब उत्पादन आणि २.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन आणि योग्य निविष्ठांचा वापर यामुळे साध्य झालेल्या या कामगिरीचे कुलगुरू डॉ. खर्चे यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यापीठनिर्मित ‘फुले सुपर बायोमिक्स’ आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचा सल्ला दिला.

क्षेत्रभेटीदरम्यान सुनील भोग व हर्षल भोग यांच्या डाळिंब तसेच पेरू बागांचीही पाहणी करण्यात आली. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी साधलेली प्रगती पाहून कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले. प्रगतशील कृषी पदवीधर शेतकरी तुषार खराडे यांच्या पेरू बागेलाही कुलगुरूंनी भेट दिली. यावेळी तरुण कृषी पदवीधरांनी विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवून तांत्रिक चर्चा करावी आणि विद्यापीठाचे आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. खर्चे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या