श्रीरामपूर : कांदा उत्पादन म्हटले की दीर्घ पीक कालावधी, वाढता उत्पादन खर्च, पाण्याचे नियोजन आणि बाजारभावातील अनिश्चितता हे शेतकऱ्यांसमोरील मोठे प्रश्न. मात्र, टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील शेतकरी नामदेव येवले यांच्या शेतातील एका प्रयोगाने या पारंपरिक समीकरणालाच आव्हान दिले आहे.
अवघ्या ६० दिवसांत कांदा तयार झाल्याचा आणि तब्बल २०० क्विंटल उत्पादन मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रयोगाची परिसरासह कृषी क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, उत्पादित कांद्याला ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या दाव्यामागील नेमके तंत्रज्ञान काय? लागवडीपासून उत्पादनापर्यंत कोणती पद्धत वापरण्यात आली? उत्पादन खर्च किती आला? पाण्याची किती बचत झाली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर आणि व्यवहार्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रत्यक्ष शेतावर मिळणार आहेत.
१ सप्टेंबरला प्रयोगाची ‘लाइव्ह’ पाहणी!
या चर्चेतील प्रयोगाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता नामदेव येवले यांच्या शेतावर, टाकळीभान येथे आयोजित करण्यात आले आहे. आदिदिशा सीड्स प्रा. लि. यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग करण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश दादा सोळंके यांनी दिली. कमी कालावधीत आणि तुलनेने कमी पाण्यात कांदा उत्पादन घेण्याच्या दृष्टीने या पद्धतीकडे पाहिले जात आहे. कार्यक्रमात शेतकऱ्यांना केवळ माहिती दिली जाणार नसून प्रत्यक्ष शेतातील पीक पाहता येणार आहे. कांदा लागवडीची पद्धत, पीक व्यवस्थापन, पाणी नियोजन, पोषण व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादन खर्च याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘६० दिवसांत २०० क्विंटल’चा दावा; आता आर्थिक गणितही समोर येणार!
शेतकरी नामदेव येवले यांच्या माहितीनुसार, या पद्धतीने त्यांच्या शेतात सुमारे ६० दिवसांत २०० क्विंटल कांदा उत्पादन झाले. कांद्याला ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रयोगाशी संबंधित लागवड व उत्पादनाची लेखी माहिती जतन करून ठेवण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यक्रमात उत्पादनाचा कालावधी, प्रत्यक्ष उत्पादन, लागवड खर्च, पाणी वापर, बाजारभाव आणि निव्वळ नफा याबाबत सविस्तर माहिती मांडली जाणार आहे. यामुळे केवळ ‘उत्पादन किती झाले?’ यापेक्षा ‘शेतकऱ्याच्या हातात प्रत्यक्ष किती पैसा उरतो?’ याचेही चित्र स्पष्ट होणार आहे.
कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसह मान्यवरांची मांदियाळी
या महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाफेड महाराष्ट्र राज्याचे संचालक केदार नाना आहेर राहणार आहेत. यावेळी कृषिभूषण सुरसिंगराव पवार, कृषिभूषण विष्णू जरे, कृषिभूषण रवींद्र चव्हाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बियाणे व कृषीविद्या विभागाचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील, उंडे ॲग्रोचे राहुल उंडे पाटील, कांदा तज्ज्ञ प्रवीण मेधने, डॉ. बाबा गोरे तसेच आदिदिशा सीड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश दादा सोळंके यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कांदा उत्पादकांच्या नजरा आता टाकळीभानकडे!
कांदा उत्पादनातील खर्च कमी करून, पाण्याचा कार्यक्षम वापर करत कमी कालावधीत उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे टाकळीभानच्या या प्रयोगाकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतावर, पिकासमोर आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबरचा हा कार्यक्रम कांदा उत्पादकांसाठी उत्सुकतेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
६० दिवसांत कांदा उत्पादनाचा दावा प्रत्यक्षात किती खरा? उत्पादनाचा खर्च किती? नफा किती? आणि हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कितपत उपयुक्त? या सर्व प्रश्नांची उत्तरे १ सप्टेंबरला टाकळीभानच्या शेतावर मिळणार आहेत.

0 टिप्पण्या