शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रसार


राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राअंतर्गत असलेल्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.पंडित खर्डे, कृषि विद्या विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाचरणे, उद्यान विद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे, कृषि भूषण डॉ. दत्तात्रय वने तसेच सहाय्यक कृषि अधिकारी सारिका हरिश्चंद्रे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचा हा उपक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शेतकरी-शास्त्रज्ञ मंच हा तंत्रज्ञान प्रसाराचा एक स्तुत्य उपक्रम असून याद्वारे शेतकर्यांना कृषी उत्पादनामध्ये येणार्या समस्यांची सोडवणूक शास्त्रज्ञ करतात. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या भेटी वारंवार झाल्यास निश्चितच शेतकर्यांना कृषि विषयक सल्ला उपयोगी पडतो.

याप्रसंगी डॉ. पाचरणे यांनी सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान, प्रा. अत्तार यांनी शेतकर्यांना फळपिके आणि भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. अडांगळे यांनी दुग्धव्यवसाय आणि चारा पिके यासंदर्भात माहिती दिली. कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने आपला स्वानुभव सांगताना म्हणाले की, मी स्वतः शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात राहून कृषि तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत केले. हे तंत्रज्ञान मी माझ्या शेतात वापरले आणि त्यामुळे मी चांगले पीक उत्पादन घेऊ शकलो. यानुसार सर्व शेतकर्यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून ज्ञानर्जन करावे आणि तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकर्यांना केले.

मंचाचे सदस्य शेतकरी शिवाजी थोरात यांच्या शेतावर ही बैठक पार पडली. यावेळी शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना खेत बचाव अभियान तसेच संतुलित खत वापर व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी माधव पिले यांच्या रूंद वरंबा सरी पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन प्रक्षेत्राला भेट दिली. या बैठकीला मानोरीचे सरपंच बापूसाहेब वाघ तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या