श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा मतमाऊली भक्तीस्थान येथे यात्रापूर्व चौथा नोव्हेना शनिवारी अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी "पवित्र मरीया – आदर्श माता" या विषयावर प्रवचन करताना धर्मगुरू फा. जॉस्टीन परेरा यांनी, "प्रभू परमेश्वराप्रमाणे आपणही प्रेम, दया आणि सेवाभाव जोपासत एकमेकांची निःस्वार्थ सेवा केली पाहिजे," असे प्रतिपादन केले.
प्रवचनात त्यांनी सांगितले की, पवित्र मरीया ही प्रेमळ, त्यागी आणि आदर्श माता होती. देवाच्या हाकेला पूर्ण विश्वासाने प्रतिसाद देत तिने येशू ख्रिस्ताला जगात आणण्याचे महान कार्य स्वीकारले. संकटे, अडचणी आणि अनिश्चितता असूनही तिने देवावरील श्रद्धा कधीही ढळू दिली नाही. त्यामुळे प्रत्येक ख्रिस्तीने तिच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन श्रद्धा, संयम आणि सेवाभावाने जीवन जगावे.
यावेळी त्यांनी आईच्या त्यागाचे हृदयस्पर्शी उदाहरण देत सांगितले की, आई आपल्या मुलासाठी कोणत्याही त्यागाला तयार असते. त्याचप्रमाणे पवित्र मरीया देखील आपल्या लेकरांच्या दुःखात सदैव सोबत उभी राहून त्यांना धीर, आशा आणि आधार देते. जीवनातील संकटे, आजारपण आणि अडचणींवर मात करण्यासाठी तिच्या मध्यस्थीने प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने गरीब, दुःखी, आजारी आणि उपेक्षितांची ज्या प्रेमाने सेवा केली, त्याच आदर्शाचे अनुकरण करून आपणही समाजातील गरजूंची सेवा करावी आणि प्रेम, दया व प्रामाणिकपणाने जीवन जगावे, असेही त्यांनी सांगितले.
या नोव्हेनाप्रसंगी सेक्रेड हार्ट चर्च, सोनगाव व संत जोसेफ चर्च, पानोडी येथील धर्मगुरू फा. जॉस्टीन परेरा, फा. आल्विन के., फा. रॉनी परेरा तसेच फा. सोवियो फर्नांडिस, फा. रमेश भोया (कॅप.), हरेगावचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रिग्ज यांच्यासह धर्मभगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाचव्या नोव्हेनामध्ये "पवित्र मरीयेची चिकाटी व सहनशीलता" या विषयावर प्रवचन होणार असून संत मेरी चर्च, संगमनेर व संत इग्नाथी चर्च, घुलेवाडी येथील धर्मगुरू सहभागी होणार असल्याची माहिती रे. फा. डॉमनिक रोझारिओ यांनी दिली.

0 टिप्पण्या