श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील शिरसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पारंपरिक फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीमच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले.
या मिरवणुकीत सहाय्यक परिवहन अधिकारी अनंत जोशी, गणेशराव मूदगुले, सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामविकास अधिकारी मनीषा तोडमल, संदीप वाघमारे, मुख्याध्यापक प्रदीप दळवी, योगेश राणे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार गणेशराव मूदगुले व ग्रामपंचायत शिरसगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गणेशराव मूदगुले, अशोकराव पवार, सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, बाळासाहेब गवारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य प्रदान करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
कार्यक्रमावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत रस्ता सुरक्षेविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. वाहतूक सिग्नलचे रंग व त्यांचे महत्त्व, रस्त्यावर खेळू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका व साहित्यही वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सिग्नलविषयीची माहिती अचूक सांगत उत्तम प्रतिसाद दिला.
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक परदेशी व तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, स्वच्छता आणि चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सुरेश मूदगुले, प्रसन्न धुमाळ, इसाक पठाण, मोरे, संदीप वाघमारे, बाळासाहेब गवारे, अशोकराव पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील सिनारे यांनी मानले.

0 टिप्पण्या