बजेटपूर्वीच पेन्शनवाढीचा प्रश्न लोकसभेत मांडणार – खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची ग्वाही


श्रीरामपूर |बाबासाहेब चेडे : ईपीएस–९५ पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा प्रश्न बजेटपूर्वीच लोकसभेत सातत्याने उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाईल आणि लवकर निर्णयासाठी प्रयत्न केले जातील, अशी ठाम ग्वाही शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. शिर्डी येथील खा. वाकचौरे यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या ईपीएस–९५ पेन्शनधारकांशी त्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

हे उपोषण पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ईपीएस–९५ पेन्शनवाढीबाबत कामगार मंत्री मनसुख मांडवीया, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून आश्वासने मिळत असली, तरी अद्याप ठोस निर्णय जाहीर न झाल्याने सार्वजनिक, खासगी, सहकारी व औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ८१ लाख पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

पेन्शनधारकांनी सेवाकाळात सामाजिक सुरक्षेसाठी रु. ४१७, रु. ५४१ व रु. १,२५० अशी नियमित कपात भरली असतानाही आज त्यांना केवळ रु. १,१७० मासिक पेन्शन मिळत आहे. त्यातच वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने अनेकांना दयनीय परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीचे कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ वर्षांपासून देशभर आंदोलन सुरू आहे. ईपीएस–९५ फंडातील वैयक्तिक योगदान रु. १२ लाखांहून अधिक असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

लोकसभेत या प्रश्नावर सकारात्मक विचार होऊन किमान पेन्शनवाढीस मंजुरी मिळावी आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने पेन्शनवाढीची घोषणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. फेब्रुवारीच्या बजेटमध्ये निर्णय न झाल्यास मार्चमध्ये नवी दिल्ली येथे भव्य आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल, असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले.

यावेळी निवेदन खासदार वाकचौरे यांचे स्वीय सहाय्यक गोपाल सपकार यांना देण्यात आले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी कार्यालयात नायब तहसीलदारांनी दुसरे निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनात अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, संघटक बापूराव बहिरट, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन जाधव, अशोक देशमुख, विनायक लोळगे, सोपान चौधरी, सुरेश कटारिया, खंडीझोड, दशरथ पवार, शिवाजी गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या