श्रीगोंदा | प्रतिनिधी : तालुक्यातील हिरडगाव येथील कै. कुणाल शांतीलाल दरेकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूला एक महिना उलटूनही दोषींवर ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला असून, न्यायाच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हिरडगाव फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने कुणालला जोराची धडक दिली. या धडकेत तो समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर व पाठीमागून धक्का दिलेल्या चारचाकी वाहनाच्या मध्ये सापडला आणि जागीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही तपासात दिरंगाई व निष्काळजीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने अखेर दि. १९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
उपोषणादरम्यान पोलीस निरीक्षकांकडून वादग्रस्त वक्तव्य झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधित वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाचा तपास आता पोलीस निरीक्षक गणेश आहेर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
२५ जानेवारी २०२६ पर्यंत सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर तहसीलदार सचिन डोंगरे व डीवायएसपी लोखंडे यांच्या उपस्थितीत कै. कुणाल दरेकर यांच्या आई-वडिलांनी पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. मात्र, ठरलेल्या मुदतीत न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने या गंभीर घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या आंदोलनास नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, कुकडी सल्लागार समिती सदस्य मिलिंद दरेकर यांच्यासह महेश दरेकर, प्रशांत दरेकर, अंबादास दरेकर, गंगाराम दरेकर, मेजर अंकुश ढवळे, नाना दरेकर, मनोहर दरेकर, राजेंद्र दरेकर, सरपंच विद्याताई बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनुभुले तसेच कै. कुणाल दरेकर यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या