अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर तालुक्यातील पढेगांव केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उंबरगांव या शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. असाच एक शनिवारचा दिवस विद्यार्थ्यांना अत्यानंद देणारा ठरला. विद्यार्थ्यांनी शाळेतच चुली थाटून चक्क पिठलं भाकर केली.
शालेय अध्यापनात आईचे कष्ट विषद करताना शाळेचे उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी विद्यार्थ्यांसमोर आईच्या विविध भूमिका सांगितल्या. त्यातीलच एक म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाक खोलीतील आईच्या कष्टांना कधीही विसरून चालणार नाही ही भूमिका मांडत असताना आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा आईला किती कष्ट सहन करावे लागतात हे शिक्षकांनी सांगताच याचे प्रात्यक्षिक करण्याचं विद्यार्थिनी ठरवलं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतच थाटलं स्वयंपाक घर आणि त्यात खमंग पिठलं भाकर !
एरव्ही विविध कामात मुलांची नेहमी अवहेलना केली जाते. मात्र शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असते असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर उंबरगांव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अनुभवयास मिळाले. मोठ्या व्यक्तींना लाजवेल अशा पद्धतीचे नियोजन विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. स्वयंपाक घरातील लागणार्या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करत शाळेत स्वयंपाकासाठी उभारण्यात येणारी चूल आणि त्यासाठी उपलब्ध केल्या विटा ! भाकरीसाठी बाजरीचे पीठ इतर सर्व बारीक सारीक गोष्टींचे यादी करून वर्गातील इतर सहकारी मित्रांकडून मिळवले. असे करता करता विसरत चाललेली चुलीत फुंकर घालणारी फुकणी देखील साकारली गेली. विद्यार्थ्यांनी स्वतःचे गट करून तीन चुलींवर शिक्षक आणि वर्गातील विद्यार्थी बंधू-भगिनींसाठी गरम गरम पिठलं भाकर करण्याचं नियोजन पार पाडले. विद्यार्थी मित्रांनी गरम गरम पिठलं भाकर सोबतच मिळालेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यावर यथेच्च ताव मारला. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुतूहलपोटी भेट दिली असता त्यांनाही जेवण करण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. पालकांनी स्वयंपकाची तारीफ केली.
शिक्षक राज जगताप यांनाही स्वयंपाक करण्याचा मोह आवरला नाही. मुख्याध्यापिका लता पालवे, मेघा साळवे, संघमित्रा रोकडे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले. उपसरपंच किशोर कांडेकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, राजेंद्र ओहोळ, माजी सरपंच चिमाजी राऊत, जितेंद्र भोसले, वारुळे, किसन इंगळे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.
0 टिप्पण्या