राहुरी / बाळकृष्ण भोसले - रंग आयुष्याचे आणि कंपन ही मानवी जीवनाचे वास्तव मांडणारी व दैनंदिन जीवन जगत असताना आसपास घडणाऱ्या घटना प्रसंगातील व्यापक निरीक्षणातून निर्माण झालेल्या कथा कवितांची पुस्तके असून त्यांना ग्रामीण लेखनशैलीचा बाज असल्याचे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्याध्यक्ष कविवर्य सुभाष सोनवणे यांनी केले.
स्वाती गोसावी लिखित रंग आयुष्याचे आणि कंपन या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ अकोले महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर एस.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार, गिरजाजी जाधव, बाळासाहेब भोर, बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे, अनिल गायकवाड, हेरंब कुलकर्णी, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, भाऊसाहेब कासार, शर्मिला गोसावी, एस.बी.जाधव, भामा गोसावी, भाऊसाहेब पुरी, रेश्मा कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष सोनवणे पुढे म्हणाले की, 'शिक्षिका म्हणून काम करताना आजूबाजूच्या घटनांच्या नोंदी ठेवत मनाच्या गाभाऱ्यात शब्दांची साठवण करून त्यातून निर्माण झालेले त्यांचे जीवननिष्ट अनुभव मांडतात. अनुभवाचं विश्व खूप मोठं असल्याची जाणीव या पुस्तकातून होते'. यावेळी बोलताना जे.डी. आंबरे पाटील म्हणाले इंग्रजी विषयाच्या शिक्षिका असूनही त्यांनी मराठी साहित्य रूपानं केलेलं लेखन हे उल्लेखनीय आहे. त्यांच्या शालेय जीवनातील कौटुंबिक जीवनातील विविध अनुभव त्या आपल्या साहित्यातून प्रामाणिकपणे मांडताना दिसून येतात. प्राचार्य डॉ.शेळके बोलताना म्हणाले, एखादी स्री माहेराला येऊन ज्या प्रमाणे आपलं मन मोकळं करते अगदी तीच सहजता स्वाती गोसावी यांच्या साहित्यातून दिसून येते.
यावेळी पो.नि.पांडुरंग पवार, संस्थेचे खजिनदार एस.पी.देशमुख, घनश्याम माने, सुनील गोसावी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुखपृष्ठकार मीनानाथ खराटे व सुजित नवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत डॉ.नितीन आरोटे यांनी केले तर प्रास्ताविक शब्दगंधच्या राज्य संघटक, कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.कामाजी जाधव यांनी तर आभार शिवराम भोर यांनी मानले. कार्यक्रमास शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाती गोसावी यांचा विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब पुरी, संदिप गोसावी, राम गिरी यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या