टेकडी तांडा येथे नाला खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ


◾माणूस उणीदास प्रकल्पांतर्गत डायोसीजन सोशल सर्विस सोसायटीचा स्तुत्य उपक्रम

विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील टेकडी तांडा येथील परीसरात पाणीपातळीत वाढ व्हावी या दृष्टीने नदीखोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाचे मंगळवारी (दि.26) भुमिपुजन करण्यात आले. या कामासाठी माणूस उणीदास प्रकल्पांतर्गत डायोसीजन सोशल सर्विस सोसायटीद्वारे पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आली.

दिवसेंदिवस कमी पर्जन्यवृष्टीमुळे पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. यासाठी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करून पावसाळ्यात प्रत्येक गावागावांत 'पाणी आडवा, पाणी जिरवा' ही मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे. या मोहीमेचा एक हिस्सा बनून माणूस उणीदास प्रकल्पांतर्गत डायोसीजन सोशल सर्विस सोसायटी काम करताना दिसत आहे. यादृष्टीतून टेकडी तांडा येथे नदीखोलीकरण काम हाती घेण्यात आले असून, या नदीखोलीकरणामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठण्यास मदत होणार आहे. साठलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होवून, पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत मिळणार आहे. याचा लाभ परीसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिकांनी संस्थेच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक फादर संजय पारखे, सरपंच सुनील राठोड, अमोल तांबे , काकासाहेब तांबे, बालचंद राठोड, जमुना तुपे, अरुण निकाळजे, अनिल राठोड, सुनील राठोड, सचिन राठोड, स्वप्निल तूपे, शांतीलाल राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या