राहुरी विद्यापीठ : विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना महाविद्यालयात संधी मिळत असते व या गुणांमुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण करण्याचे काम शिक्षक करीत असतात. शेतकऱ्यांचे मुले प्रशासनात आली व बहुजन वर्गातील मुले शिकून शिक्षक झाली. परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. शेतकरी जसा आहे तसाच आहे. ही परिस्थिती बदलणे कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. वास्तवात जगा आभासी जगात राहू नका. संशोधनाची वृत्ती जोपासा. संशोधनाचा निश्चितच फायदा होईल. आपण शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाला व कृषी विद्यापीठाला विसरू नका असे प्रतिपादन अहमदनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव या महाविद्यालयाचा पहिला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय कळमकर बोलत होते. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, विद्यार्थी परिषद सभापती कुमारी मयुरी गुंजाळ, निमंत्रक वैष्णवी कासार, अजिंक्य साबळे, गोविंद भराड, सोनाली धूळगुंड, शिवम विरकर व वैभव पवार उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. शरद गडाख म्हणाले की महाविद्यालयीन जीवनात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा दिवस विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस असतो. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला, क्रीडा व अभ्यास या क्षेत्रांमध्ये जे नैपुण्य दाखवले, त्यांना शाबासकी देण्याचा हा दिवस. कृषी शिक्षण घेत असताना महाविद्यालयात सर्व स्तरातील विद्यार्थी येत असतात. यामध्ये गरीब- श्रीमंत असा भेदभाव होत नाही व त्यामुळे मनातील न्यूनगंड दूर होतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक सुदृढ झाले पाहिजे. प्रत्येकाने शिस्त बाळगली पाहिजे त्याशिवाय माणूस पुढे जात नाही. कृषी शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनले पाहिजे. नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले की कृषी शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात आपले करिअर करण्याच्या संधी आहेत. विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीबद्दल त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी डॉ. मिलिंद अहिरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने सकारात्मक असले पाहिजे. प्रकृती आणि पर्यावरण याचा संबंध असला पाहिजे तसेच जीवनामध्ये ध्येय व स्पर्धा असल्याशिवाय प्रगती होणार नाही. यावेळी त्यांनी भारताचा वेगवान धावपटू मिल्खा सिंग यांचे उदाहरण दिले. यावेळी वर्षभरात महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी महेश जाधव, चंद्रशेखर वाळे, मंजिरी पाटील, मानसी पाटील व अंजली पाटील यांनी केले. डॉ. मनोज गुड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरोटे, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. विजू अमोलिक, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव एकनाथ बांगर, अनिल शेळके, विशाल भोसले, महेश सुरवसे, अमृता सोनवणे, सौ. वैशाली पोंदे, सौ. ज्योती सासवडे, सौ. अंजली देशपांडे, सौ. विद्या पुजारी यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या