स्थानिक बाजारपेठेतील मागणीनुसार दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करावी- डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पदव्युत्तर महाविदयालया मार्फत अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत एकदिवसीय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती हा प्रशिक्षण वर्ग कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) व शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद रसाळ यांनी जागेची निवड, स्थानिक बाजारपेठेतील दुग्धजन्य पदार्थाची मागणी, कच्या मालाची गुणवत्ता, विक्री व्यवस्थापन इत्यादी गोष्टीचा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व्यवसायाच्या दुष्टीने उहापोह केला.

आखिल भारतीय समन्वयित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. संजय मंडकमाले यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उघोगातील संधी, विरजवलेले/आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान, बासुंदी, रबडी, खवाजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच दही लावणे, श्रीखंड, लस्सी, पनीर, बासुंदी, रबडी, खवा व पेढे, सुगंधी दुध इ.पदार्थाचे प्रशिक्षणार्थीना प्रात्यक्षिक करुन दाखवले. सदरील प्रशिक्षणात राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे, डिग्रस इ. गावातील 30 महिलांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संजय मंडकमाले, डॉ. विणु लावर, डॉ. दिलीप देवकर, डॉ. बाळासाहेब पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. दिलीप देवकर यांनी केले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या