स्वराज्य, संस्कृती आणि समाज वाचविण्याची जबाबदारी लेखकांची–प्रो. डॉ. पुष्पिता अवस्थी

सात्रळ महाविद्यालयात हिंदी विषयाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 

राहुरी / बाळकृष्ण भोसले - काळाबरोबर आव्हाने ही बदलत आहेत. संपूर्ण जग भयंकर अशा संकटांना सामोरे जात आहे. अशा परिस्थिती मध्ये स्वराज्य, देश, संस्कृती, परिवार आणि समाज वाचविण्याची जबाबदारी लेखकांची आहे, असे मत प्रतिपादन नेदरलँड येथील हिंदी युनिवर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रो.डॉ. पुष्पिता अवस्थी यांनी केले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथि म्हणून यू. के. येथील लेखनी डॉट नेट मासिकाच्या संपादक श्रीमती शैल अग्रवाल उपस्थित होत्या.

डॉ. अवस्थी ह्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील हिंदी विभाग, अंतर्गत गुणवत्ता प्रकोष्ठ आणि महाराष्ट्र हिंदी परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून संपन्न “हिंदी साहित्य विमर्श के विविध आयाम” या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, संपूर्ण विश्व विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. अशा परिस्थितिमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम” या विचाराची गरज आहे. त्याची सुरवात स्वत:पासून व्हायला हवी. आज साहित्यातील विविध प्रवाहांचे राजनीतीकरण झाले आहे. भारत गांधीजी, विनोबा, सरदार पटेल, दयानंद सरस्वती आदींच्या विचाराची भूमी आहे. इथे वैचारिक चिंतनाची बीज पेरली गेली आहेत. परंतु विदेशात चिंतनाचा अभाव आहे.

श्रीमती शैल अग्रवाल म्हणाल्या, ब्रिटेनमध्ये हिंदीचा प्रचार - प्रसार चांगला होत आहे. स्वातंत्र्याच्या काळात जो उत्साह समाजामध्ये होता. ‘ प्रत्येक धर्म माझा आहे’ ही भावना होती. एकत्रित कुटुंब होते. मोठ्यांचे मार्गदर्शन होते, संपूर्ण देशात सौहार्दपूर्ण वातावरण होते. त्याचीच आज गरज आहे. त्यांनी बोलताना खंत व्यक्त केली की हिंदी सर्वांची असून ही ती कोणाची ही होऊ शकली नाही, न ती देशाची होऊ शकली आणि न ती विदेशाची. यावर विचार होण्याची गरज आहे. हिंदी चित्रपट आणि वेब मीडियाने हिंदी भाषेच्या विकासामध्ये मोलाची भूमिका राहिली आहे, असे ही त्यांनी नमूद केले.

दोन दिवस सुरू असलेल्या या चर्चासत्राच्या पहिल्या दिवसी उद्घाटन कार्यक्रमासाठी त्रिभुवन विद्यापीठ, काठमांडू, नेपाळ येथील केंद्रीय हिंदी विभागाचे डॉ. विनोदकुमार विश्वकर्मा यांनी हिंदी साहित्यातील विविध प्रवाह या विषयावर बीज भाषण केले. ते म्हणाले साहित्य प्रवाहाच्या केंद्रस्थानी अस्तित्व आणि अस्मिता महत्वाची आहे. ज्या स्त्री विचारधारेचा प्रवाह आज चर्चिला जात आहे त्याची मुळं संत मीराबाई पासून दिसून येतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. विजयकुमार रोडे होते. ते म्हणाले, हिंदी दलित साहित्याची मूल प्रेरणा मराठी दलित साहित्य आहे. आजच्या साहित्याचे सौंदर्यशास्त्र वेगळे आहे. दलितेतर लेखककडून लिहिले गेलेले साहित्य न्यायपूर्ण व परिपूर्ण असत नाही. त्या-त्या समाजातील लेखकांनी पुढे येऊन अभिव्यक्त व्हायला हवं. आणि ते लेखन हिंदी मराठी मधून होत आहे. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री सिनगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य प्रो.डॉ. सोमनाथ घोलप यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांचा आढावा घेत चर्चासत्रासाठी शुभेच्छा देत साधक बाधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या चर्चासत्रासाठी मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ. सचिन गपाट, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील डॉ. मुकेश कुमार मिरोठा, डॉ. राधेशाम पनवरिया, भोपाल, कर्नाटक येथील प्रभारी प्राचार्य डॉ. किरण चौगले, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष प्रो. डॉ. जिजाबराव पाटील, प्रधान सचिव डॉ. गजानन चव्हाण, बीड येथील डॉ. प्रकाश कोपार्डे इत्यादी मान्यवरांनी साधन व्यक्ति म्हणून मार्गदर्शन केले. यामध्ये साहित्यामध्ये दलित, दिव्यांग, आदिवासी, किन्नर, बाल, किसान, पुरुष, स्त्री आदींचे स्थान यावर चर्चा झाली.

पाहुण्यांचा परिचय डॉ. अनंत केदारे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक व हिंदी विभागप्रमुख, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप यांनी मानले. या ऑनलाइन चर्चासत्रासाठी देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, असम, उत्तराखंड, म्ध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू कश्मीर इत्यादी राज्यातून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. सोनाली भोसले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या