ढोरकीन येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी


विलास लाटे /पैठण : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले सण, उत्सव यावर्षी कोरोनाचे निर्बंध उठताच मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याचे दिसून येत आहे. पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी गावातील सर्व युवक व ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

दरम्यान, शुक्रवारी (दि १५) रोजी रात्री युवकांनी शेकडो कावडीने पैठणच्या गोदावरीचे पवित्र जल आणुन शनिवारी (दि.१६ एप्रिल) रोजी सकाळी हनुमान जयंती निमित्ताने ढोरकीन येथील महारुद्र मारोती मंदिरात शेकडो कावडीने हनुमान मूर्तिवर जलाभिषेक करण्यात आला. तत्पुर्वी पहाटे मंदिरात संत एकनाथ भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. व नंतर आरती करण्यात आली. तद्नंतर भक्ती गीतांच्या गजरात भव्य कावड मिरवणुक झाली. यावेळी मिरवणूक मार्गावर सडा, रांगोळी करुन परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला होता. या भव्यदिव्य मिरवणूकीने व फुलांच्या पायघड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

यावेळी "जय श्री राम, बजरंग बली की जय, पवनपुत्र हनुमान की जय"अशा जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमुन गेला होता. कावड मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या हनुमान जयंती उत्सवासाठी गावातुन सर्व लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या