राहुरी येथे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन

राहुरी शहर / अशोक मंडलिक : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या संकल्पनेतून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आयोजनातून व वाबळेज् इव्हेंट यांच्या संयोजनातून दिनांक 14 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान नगर मनमाड रोड बाजार समिती शेजारील वाय. एम. सी. ए. मैदानावर शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सभापती अरुण तनपुरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्री. तनपुरे म्हणाले स्पर्धेच्या युगामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली तरच शेतकरी टिकेल. सातत्याने पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, हवामानामध्ये होणारे बदल, यामुळे शेती व्यवसाय अत्यंत धोक्यात आला आहे. या दुष्टचक्रातून आपला शेतकरी वाचला पाहिजे व त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तरच तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल. महाराष्ट्रातील शेतकरी हा मुख्यतः ग्रामीण भागांमध्ये राहतो. या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ यांच्या संकल्पनेतून असे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत कि, ज्या ठिकाणी भारताच्या सर्वच भागातील कृषी व्यवसायिक, धोरणकर्ते, समविचारी व्यक्ती, सरकारी अधिकारी आणि प्रसारमाध्यमे या सर्वांना एकत्र आणून भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य बळकट करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करत आहोत.

सदर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बी- बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, हार्वेस्टिंग यंत्रे, ट्रॅक्टर्स, आधुनिक अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शन पुस्तके, शेळीपालन, ठिंबक सिंचन, सोलर उत्पादने, मच्छी व्यवसाय, मच्छी पालन, त्याचबरोबर महिला बचत गटाचे उत्पादने, ऑटो, गृहोपयोगी वस्तू, तालुका कृषी विभाग धान्य महोत्सव अशा अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण म्हणून दीड टन वजन व एक कोटी किंमत असलेला गजेंद्र रेडा शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार असून सदर प्रदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ चेही आयोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी दररोज परिसंवाद व तज्ञांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त व्यवसायिकांनी सहभागी व्हावे व शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. व्यवसायिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली उपकरणे पोहोचावीत असे सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरेे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ताराचंद तनपुरेे, बाबा कल्हापुरे, आरुण ठोकळेे, वाबळेज इव्हेंटचे अजय वाबळे, विजय शेलार, नितीन जठार, श्री.जरे, श्री. डुक्रे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या