नगर-मनमाड महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - सुजित वाबळे

तीन महिन्यांत आठजणांचा बळी अनेक जखमी

राहुरी / बाळकृष्ण भोसले - नगर मनमाड या राज्य महामार्गापैकी नगर ते कोपरगाव या मार्गाचे डांबरीकरणाचे काम शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या पुणे स्थित कंपनीने घेतलेले आहे. गुहा परिसरात चार महिन्यांपासून हे काम सुरू असून सुरक्षा विषयक नियमांचे कोणतेही निकषांचे पालन केले जात नाही. त्यामुळे रस्त्यावरील अपघातात आठ बळी गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व युवा उद्योजक सुजित वाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.

तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक उर्हे, उपसरपंच अविनाश ओहोळ, रामा बर्डे, शिवाजी मांजरे, डॉ.विजय वाबळे यांचेसह ग्रामस्थांनी मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिले. चार महिन्यांपासून गुहा पाट ते गुहा परिसरात रस्ता डांबरीकरण व सहापदरी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कुठेही कामासंदर्भात प्रवासी, वाहनचालक सुरक्षितता या दृष्टीने फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने अपघात झालेले आहेत. आजपर्यंत या परिसरात झालेल्या अपघातात आठ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. सुरक्षाविषयक माहिती फलक असते तर प्रवाशांचे प्राण वाचू शकले असते. कंपनीला त्याबाबत सातत्याने सूचना देऊनही कंपनीने या सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा या भागात दौरा असताना कार्यकर्त्यांनी या भागातील अपघाताच्या वाढत्या प्रमाणाविषयी प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित केला. मंत्री तनपुरे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून दिशादर्शक कामाच्या फलकाची माहिती देणारे विशेषतः रात्रीही दिसू शकतील अशा रिफ्लेक्टर मध्ये हे फलक लिहिण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. कंपनीच्या नगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व कामात तातडीने आवश्यक त्या सुधारणा होत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या.

हे काम अत्यंत संथ गतीने होत असून दररोज किमान एक तरी अपघात या ठिकाणी होत आहे. सुरक्षाविषयक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. आवश्यक त्या सूचना देणारे फलक त्या ठिकाणी रात्रीही दिसू शकतील अशा पद्धतीने लिहिणे गरजेचे आहे. तसे झाले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. एका बाजूने रस्ता पूर्णपणे खोदण्यात आलेला आहे. कुठे तो एकाच बाजूने खुला आहे. मात्र त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी नियंत्रित करण्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वाहतूक अधिक असुरक्षित, वेळ घेणारी झाली आहे. सतत वाहतुकीची कोंडी होते आहे. त्यातूनच अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. दररोज एक तरी अपघात होतो आहे. हे लक्षात घेऊन याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
तीन महीन्यात आठ मृत्यू. अनेक जखमी.
पुष्पा जैस्वाल सह दोन भाविक, भागवत मनोहर ओहोळ, वंदना विलास सौदागर, राहुल सुरेश ओहोळ, पियुष बलमे, राम वाघ हे या भागात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले. अमित संपत भोसले, अंबादास राजाराम डुक्रे हे गंभीर जखमी झाले. सुरक्षारक्षक नियमांचे रस्ता ठेकेदाराने पालन न केल्याने हे अपघात झाले आहेत. आणखी किती अपघात झाल्यावर ठेकेदार कंपनीला जाग येईल असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या