प्रकाशमान आठवणींचा सांस्कृतिक डोह- डॉ. मिलिंद कसबे

( लेखक, समीक्षक : मो. 9766984770 )

राहुरी / बाळकृष्ण भोसले - सुनील गोसावी या नावाचा अर्थ शब्दगंध उधळून परिवर्तन करू पहाणारा जबाबदार कार्यकर्ता असा घेतला पाहिजे. संयत-संयमी आणि निर्मळ नैतिकता लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व आहे. सुनील आणि शर्मिला या दोघांचीही वाटचाल सत्त्यशोधक समाजशोधनाची वाटचाल आहे.

समाजाचा कणवाळा असलेला आणि सत्त्याच्या दिशेने पाऊले टाकणारा सुनील गोसावी यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता अलिकडे दिसत नाही. अलिकडे कार्यकर्ता या शब्दाचा विपर्यास होत असताना किंवा या शब्दाचा राजकीय इव्हेन्ट होत असताना अहमदनगरच्या मातीत सुनील आणि शर्मिला यांचे क्रांतीदर्शी व्यक्तिमत्त्वे प्रकाशमान व्हावेत ही गोष्ट फार मोलाची आहे.

गेल्या वीस वर्षांपासून सुनील गोसावींचा उजेडाकडून अधिक उजेडाकडे जाणारा प्रवास मी अनुभवतो आहे. त्यांनी अथक प्रयत्नांनी आणि मोठ्या ध्येयनिष्ठेने उभी केलेली शब्दगंध वाड्मय चळवळ, शब्दगंध प्रकाशन आणि शब्दगंध साहित्य संमेलने या सर्वांचा मी सहभागी व सहकारी साक्षीदार आहे. अहमदनगर जिल्ह्याला सांस्कृतिकदृष्ट्या अभिरुची संपन्न बनविण्यात सुनील गोसावी, भगवान राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा वाटा मोठा आहे. शब्दगंध या वाड्मयीन चळवळीचे सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य सर्वांसाठीच उर्जा देणारे आहे. सुनील गोसावी आणि त्यांच्या समाजशिल साथीदारांनी समाजप्रबोधनाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते ध्येयनिष्ठेने परिवर्तनाच्या चळवळीत योद्ध्यासारखे उभे आहेत. सुनीलचे असे क्रांतीदर्शी रूप अचानक तर उभे राहिले नाही. त्यामागे मोठा इतिहास आहे. सुनीलची जडणघडण आणि त्यांची कार्यकर्ता म्हणून जी वाटचाल आहे यामागे अनुभवांचे खूप मोठे भांडार आहे. सुनील आणि शर्मिलाच्या प्रत्येक भेटीत त्यांच्याकडून नेहमीच नवे नवे अनुभव ऐकायला मिळायचे. हे अनुभव एक निर्मळ माणूस, सच्चा कार्यकर्ता आणि ध्येयनिष्ठ प्रकाशक म्हणून नेहमीच भावत असे. सुनीलचे हे अनुभव पुढच्या पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहेत, असे अनेकांसह मलाही नेहमीच वाटायचे.

एक दिवस सुनीलचा फोन आला आणि त्यांनी पाठविलेले ‘आठवणींचा डोह’ या पुस्तकाचे टंकलेखन हाती पडले. सुनीलच्या आयुष्याची यशोकहाणी वाचताना मी मनापासून भारावलो आणि आनंदूनही गेलो. कोरडगावपासून सुरू झालेला सुनील गोसावी यांचा जीवनप्रवास अहमदनगरच्या मातीत किती घट्ट रुतला आहे याची साक्ष हे पुस्तक वाचताना पटली. सुनील गोसावी यांचे हे पुस्तक दोन-तीन अंगाने मला फार महत्त्वाचे वाटते. एकतर स्थानिक इतिहासलेखनाचे नवे प्रारूप घेऊन हे पुस्तक आपल्यासमोर आले आहे. दुसरे म्हणजे सध्याच्या आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि बदलत्या भांडवलशाहीच्या काळात भारतीय समाजव्यवस्थेतल्या न्याय आणि समतेवर उभ्या असलेल्या अनेक मुलभूत गोष्टी नामशेष होत असताना, विशेषतः कार्यकर्त्याचे कर्तेपण बदलत असताना सुनील गोसावी यांचे हे पुस्तक राजकीय उत्सव आणि नफेखोरीच्या पलिकडे वावरणार्‍या कार्यकर्त्यांसाठी पुनर्उर्जा घेऊन आले आहे. समाजात वावरणार्‍या अशा अनेक अनामिक व सच्च्या कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक दीपस्तंभ ठरावे असे आहे. याबरोबरच या पुस्तकातली मला भावलेली तिसरी गोष्ट म्हणजे वाङ्मयाच्या अंगाने या पुस्तकाकडे पाहिले तर सुनील गोसावी यांनी आत्मकथन, आत्मचरित्र, आत्मलेखन अशा पारंपरिक वाङ्मयीन संकेतांतून बाजूला काढून आपल्या लेखनाला त्यांनी ‘आठवणींचा डोह’ हे नवे परिमाण बहाल केले आहे. मराठी साहित्यात ही नवी परिमाणे रुजताहेत ही गोष्ट वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून मला महत्त्वाची वाटते.

सुनील गोसावी यांच्या या लेखनाला आत्मचरित्र म्हणायचे की आत्मकथन म्हणायचे असा प्रश्न वाङ्मयाच्या अभ्यासकांना नक्कीच पडू शकेल. या पुस्तकाला आत्मचरित्र म्हणायचे तर रूढार्थाने हे आत्मचरित्र नाही. याची दोन कारणे आहेत. एक तर आत्मचरित्र लिहिण्यासाठी जे वय मानले जाते, तेवढे सुनील गोसावी यांचे नाही. दुसरे म्हणजे जीवनानुभवांचा जो खोल खजिना आत्मचरित्र लेखकाकडे असायला पाहिजे तोही तेवढा काठोकाठ भरलेला सुनील यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे सुनील यांच्या या अनुभवांना रूढ अर्थाने आत्मचरित्र म्हणणे वाङ्मयीन चौकटीत बसणारे नाही. मग सुनील यांच्या या लेखनाला आत्मकथन म्हणायचे का? तर मला वाटते सुनील यांचे हे लेखन आत्मकथनाच्या वाटेकडे जाणारे आहे; परंतु ते आत्मकथनही नाही. दलित-ग्रामीण साहित्यप्रवाहांत आत्मकथांचा जो साचा तयार झाला आहे त्या साच्यात सुनीलच्या लेखनाला बसविणे हेही अन्यायाचे होईल. मग प्रश्न उरतो तो सुनील यांच्या ‘आठवणींचा डोह’ या पुस्तकाला नेमके काय म्हणता येईल? सुनील गोसावी यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या निमित्ताने एक नवाच फॉर्म आपल्यासमोर ठेवला आहे. इंग्रजी साहित्यात आत्मचरित्रात्मक कादंबरी, आत्मचरित्रात्मक ललित लेखन असा जो लेखनप्रकार विकसित झाला आहे तो मला नेहमीच महत्त्वाचा वाटत आला आहे. मराठीत मात्र तो प्रकार फारसा विकसित झाला नाही. आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यात आत्मचरित्रात्मक कादंबर्‍यांचे लेखन करून या वाङ्मयप्रकाराला काहीशी चालना दिली, परंतु आपल्या आयुष्यातल्या आठवणींची शब्दसाठवण करून ती वाचकांच्या ओंजळीत देता येते का? याविषयीची प्रयोगशिलता मराठीत फारशी कुणी दाखवली नाही. नाही म्हणायला मराठीतल्या उच्चभ्रू मुख्य प्रवाहात काही लेखकांनी ललित दृष्टिकोनातून आपल्या जीवनानुभवांना मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु बहुजनांच्या साहित्यप्रवाहात मात्र असे काही निटसे घडले नाही. या अर्थाने हे पुस्तक आत्मपर ललित लेखन नसले तरी सुनील गोसावी यांचे हे पुस्तक अनेकार्थाने वेगळे आहे. इथे सत्त्य-असत्त्याची तपासणी नाही किंवा लेखकाची आत्मप्रौढीही नाही. या पुस्तकातला नायक मात्र जे काही सांगू पहातोय ते केवळ जग बदलण्यासाठी. समाजप्रबोधनासाठी. सांस्कृतिक बदलासाठी. त्यामुळे सुनील गोसावी यांच्या या आत्मपर आठवणींना कोणत्या वाङ्मयीन फॉर्ममध्ये बसवायचे हा प्रश्न उरतोच.

वाङ्मयाच्या दृष्टीने विचार करायचा झालाच तर सुनील गोसावी यांचे ‘आठवणींचा डोह’ हे पुस्तक इंग्रजी वाङ्मयातल्या (चशोळी) मेमोइर फॉर्ममध्ये बसणारे आहे. हा फॉर्म आत्मचरित्राच्या जवळ जाणारा आहे, पण हे आत्मचरित्र नाही. मेमोइरचा मराठी अर्थ ‘आठवण’ असा होतो. आत्मचरित्र म्हणजे ज्याला इंग्रजीत र्ईीेंलळेसीरहिू म्हणतात ते आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिले जाते. याचा उद्देश आपल्या आयुष्यातील कृती आणि निर्णय यांना स्पष्ट करणे असा असतो. त्यात लेखकाचे संपूर्ण आयुष्य गुंफलेले असते. आत्मचरित्रात आठवणी नक्कीच असतात, पण त्या आठवणी आत्मचरित्र लेखकाच्या आयुष्याशी निगडित असतात.

‘आत्मचरित्र’ आणि ‘आठवणी’ यात काहीसा फरक आहे. मेमोइरमध्ये लेखकाने आपल्या जीवनातला विशिष्ट काळ निवडलेला असतो. यातले वर्णनही काळ आणि घटनांवर आधारित असते. मेमोइर कधीही लिहिले जाऊ शकते. त्याला वयाचे बंधन नसते. विशिष्ट काळात आपल्याला आलेल्या अनुभवांमागील भावना दर्शविणे आणि त्या भावनेचे प्रकटीकरण करणे हा उद्देश आठवणी म्हणजे मेमोइर लिहिण्यामागे असतो. इंग्रजी वाङ्मयात हा वाङ्मयप्रकार बराच लोकप्रिय आहे. विशेषतः तरुण लेखकांसाठी हा वाङ्मयप्रकार अधिक महत्त्वाचा आहे. सुनील गोसावी यांचे हे पुस्तक मराठी साहित्यात‘मेमोइर’ हा इंग्रजी लेखन फॉर्म रुजवणारा आहे. तरुण कार्यकर्ते, लेखक आणि कलावंतांसाठी आपल्या आठवणींना अभिव्यक्त करणारा हा लेखनप्रकार फारच महत्त्वाचा आहे. मराठीत हा लेखनप्रकार फारसा रुजला नाही, परंतु सुनील गोसावी यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या रूपाने या महत्त्वाच्या लेखन प्रकल्पाकडे वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘आठवणींचा डोह’ या पुस्तकाचे नाव अगदीच समर्पक आहे. जे मेमोइर या लेखनप्रकाराची पुन्हा पुन्हा आठवण करून देते. सुनील गोसावी यांचा जन्म १९७१ सालचा असावा. या पुस्तकात १९७५ पासून ते २०२० पर्यंतच्या आठवणी सांगितल्या आहेत. म्हणजे सुनील गोसावी या कार्यकर्त्याच्या जीवनातल्या पंचेचाळीस वर्षांच्या आठवणींचा डोह या पुस्तकात साठलेला आहे. सुरुवातीच्या काही भागात त्यांचे बालपण आणि पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव या त्यांच्या वडिलांच्या गावापासून पासून सुरू झालेली आठवणींची वाट पुढे अधिकाधिक विस्तृत होत जाते. १९७१ ते १९९० या वीस वर्षातले सुनील गोसावी गावगाड्यातल्या अनुभवांना जोडलेले आहेत. शेती-माती-ग्रामीणता आणि कष्टाने भरलेले नात्यांचे मानवी बंध असे सारे काही या पुस्तकाच्या पहिल्या टप्प्यात येते. या पुस्तकाचा खर्‍या अर्थाने सामाजिक-सांस्कृतिक प्रवास सुरू होतो ते १९९० नंतर. १९९० ते २०२० या तीस वर्षांचा काळ हा या पुस्तकातला सामाजिक आशय आणि समाजातले अनेक ताणेबाणे सांगणारा आहे. या काळात कार्यकर्ते म्हणून सुनील गोसावी अधिक लढावूपणे वाचकांच्या समोर येतात. सामाजिक चळवळी, शिक्षणामुळे विचारात आलेली सच्ची बंडखोरी, राजकीय प्रश्नांकडे बघण्याची चिकित्सक वृत्ती, सांस्कृतिक-सामाजिक परिवर्तनासाठी उभे केलेले संस्थात्मक कार्य, समाजसेवक अण्णा हजारे ते लेखक उत्तम कांबळे यांच्यापर्यंतच्या असंख्य माणसांशी लेखकाचा आलेला संबंध आणि या सार्‍यातून लेखकाचे उभे राहिलेले लढावू व्यक्तिमत्त्व. हे सारे या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात वाचायला मिळते. एक वाचक म्हणून मला हा दुसरा भाग अधिक भावला. विशेष म्हणजे व्यवस्थेला समजून घेऊन, वेळप्रसंगी जाब विचारून त्यातले प्रश्न सोडवण्यासाठी सुनील गोसावी जी पाऊले टाकतात ती सारीच सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक ठरतात.

१९९० नंतर समाजव्यवस्थेत अनेक बदल झालेले आहेत. विशेषतः मुक्त अर्थव्यवस्थेच्या आगमनाने सहकार, शेती आणि प्रबोधनाच्या चळवळी या सगळ्यांवर मोठा परिणाम झाला. पर्यायी जागतिकीकरणाच्या आगमनाने तर सारेच काही बदलून गेले. साहित्य, समाज आणि सांस्कृतिक घटीते या सगळ्यांवर जागतिकीकरणाचा मोठा परिणाम झाला. भांडवली अर्थव्यवस्था जशी जशी फिरवेल तशी तशी माणसं फिरू लागली. सामाजिक चळवळीत ध्येयनिष्ठा आणि मूल्य जपत वावरणार्‍या कार्यकर्त्यासमोर अनेक पेचप्रसंग उभे राहिले. विशेषतः गल्लीबोळात दिखावू कार्यकर्त्यांची तत्त्वशून्य पिढी राजकारणाने जन्माला घातली. अशा नव्या सांस्कृतिक संघर्षात सुनील गोसावींसारखा कार्यकर्ता मूल्यांची कास धरत नवे स्वप्न घेऊन उभे रहातो. ही गोष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनासाठी खूप महत्त्वाची आहे असे मी समजतो.

‘आठवणींचा डोह’ या पुस्तकाचा नायक केवळ सुनील गोसावी नाहीत तर सुनील यांच्या सामाजिक जगण्यात जी जी भली माणसं आली. जे जे संघर्ष आले ते या पुस्तकाचे नायक बनले आहेत. याचाच अर्थ या पुस्तकातल्या सुनील गोसावी यांच्या आठवणी केवळ त्यांच्या नाहीत तर त्या त्यांनी अनुभवलेल्या सांस्कृतिक पटलाच्या आठवणी आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार लहू कानडे, समाजसेवक बाबा आढाव, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. रावसाहेब कसबे, पद्मश्री पोपटराव पवार अशा अनेक मान्यवरांच्या सहवासात सुनील गोसावी यांची जडण-घडण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातले सामाजिक कार्य जसे सुनीलने जवळून अनुभवले आहे. तसेच या जिल्ह्यातले संघर्ष आणि सहकाराने भरलेले राजकारणही सुनील गोसावी यांनी तेवढेच जवळून अनुभवले आहे. म्हणूनच सुनील गोसावी यांचे हे पुस्तक अहमदनगर जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास अधोरेखित करणारा आहे.

इतिहास संशोधनात ‘लोकल हिस्टरी’ ही अत्यंत चांगली संशोधनपद्धती अलिकडे विकसित होत आहे. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये या अभ्यास पद्धतीची सुरुवात झाली. पुढे फ्रान्स, अमेरिका आणि मग जगभरात या अभ्यासपद्धतीचा गवगवा झाला. भारतात अलिकडे ही अभ्यासपद्धत रुजत आहे. स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, राष्ट्रीय इतिहास आणि मग जगाचा इतिहास असा या अभ्यासाच्या मांडणीचा क्रम आहे. आजपर्यंत राष्ट्रीय आणि जागतिक इतिहासाबद्दल खूप मांडले गेलेले आहे. परंतु यात स्थानिक इतिहास लेखन काहीसे दुर्लक्षित राहिलेले दिसते. स्थानिक इतिहास नीट मांडला गेला नाही तर अनेक गडबडी होऊ शकतात. अनेक परस्परविरोधी वादळे निर्माण होऊ शकतात. भारतात स्थानिक इतिहास बर्‍याच वेळा स्थानमहात्म्य सांगण्यासाठी लिहिला जातो. गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तुंचे अथवा मंदिरांचे महात्म्य सांगण्यासाठी लिहिला जातो. हा इतिहास प्रकाशात येण्याची नक्कीच गरज आहे परंतु इतिहास हा केवळ गड, किल्ल्यांवरच वावरायला लागला की तो श्रद्धेचा विषय बनतो. अशावेळी त्यातून हाडामासाची माणसे मात्र गायब होतात. त्यांच्या सावल्या पुसल्या जातात आणि धर्माने उभ्या केलेल्या कल्पना अधिक मोठ्या होतात. अशा मोठ्या झालेल्या कल्पना मग माणसांचीच घरे पेटवतात. राजकारण्यांचे शस्त्र बनून भ्रष्टाचाराचे केंद्र बनतात, तर कधी त्या सामाजिक शोषणाचा अड्डाही बनतात. स्थानिक इतिहास लेखनात प्रतिभा आणि प्रतिकांपलीकडे जाणारा माणसांचा इतिहास मांडला की सावल्या मोठ्या होणार नाहीत. त्या शस्त्र बनणार नाहीत आणि शोषणाचा अड्डाही बनणार नाहीत. अशावेळी माणसाला प्रतिष्ठा मिळेल आणि त्याच्या शौर्याचे व कार्याचेही कौतुक होईल. श्री. सुनील गोसावी यांचे हे लेखन स्थानिक इतिहासलेखनाचा अपेक्षित नमुना नक्कीच आहे. या पुस्तकात ग्रामसंस्कृतीचे समर्पक वर्णन आहेच, परंतु या पुस्तकात अनेक उर्जावान माणसांच्या कार्याचा आढावाही मांडला आहे. या अर्थाने हे पुस्तक अहमदनगर जिल्ह्याचा वर्तमान सामाजिक-सांस्कृतिक इतिहास मांडणारे आहे. स्थानिक आणि प्रादेशिक इतिहास लेखनाचा आश्वासक नमुना म्हणून हे पुस्तक मला अनेकार्थाने महत्त्वाचे वाटते. सुनीलसारखे असंख्य कार्यकर्ते जेव्हा जेव्हा आपल्या जीवनातल्या अशा आठवणींना शब्दबद्ध करतील तेव्हा तेव्हा तो तो स्थानिक इतिहास अधिक माणूसकेंद्री आणि समाजकेंद्री होईल यात शंका नाही.

सुनील गोसावी यांच्या पुढील सामाजिक कार्याला आणि त्यांच्या लेखनाला मनापासून शुभेच्छा देऊन मी त्यांच्या ‘आठवणींचा डोह’ या पुस्तकाचे तमाम वाचकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या