राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे एफ.एम.सी. इंडिया प्रा.लि., मुंबई व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सांमजस्य करार करण्यात आला. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, एफ.एम.सी. इंडियाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. आनंदकृष्णन बलरामन, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील, कंपनीचे कार्पोरेट विभागाचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. बकुळ जोशी, मुख्य मार्केटींग ऑफिसर डॉ. सी.ए.एस. नायडू, कंपनीचे महाराष्ट्र राज्याचे फिल्ड डेव्हलोपमेंट मॅनेजर जयेश चौधरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शरद गडाख मार्गदर्शन करतांना म्हणाले की एफ.एम.सी. इंडिया प्रा.लि., मुंबई यांच्यातर्फे पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येणारी फेलोशीप हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्यासाठी त्यांना मोलाचे सहकार्य उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उद्युक्त करण्यासाठी हा अगदी योग्य प्लॅटफार्म आहे. जेणेकरुन संशोधन, शिक्षण व विस्तारामध्ये भरीव असे योगदान विद्यार्थ्यांकडून देता येईल. डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठातील शिक्षण उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी डॉ. आनंदकृष्णन यांनी कंपनी विविध क्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी एफ.एम.सी. इंडिया प्रा.लि. आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि क्षेत्रातील संशोधन कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. बकुळ जोशी यांनी कंपनीच्या फेलोशीप उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. सी.ए.एस. नायडू यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनची माहिती दिली. यावेळी एम.एस्सी. (कृषि) किटकशास्त्र विषयात शिक्षण घेणार्या ज्ञानेश्वर चूते या विद्यार्थ्यांस कंपनीची फेलोशीप देण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. जयेश चौधरी यांनी उन्हाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यायची या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय हजारे यांनी तर आभार डॉ. तानाजी नरुटे यांनी मानले.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, पीक रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, मृदविज्ञान व कृषि रसायन शास्त्र प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, एफ.एम.सी. इंडिया प्रा.लि. कंपनीचे महाराष्ट्राचे विक्री संचालक योगेंद्र जाडोन उपस्थित होते. यावेळी कृषि किटकशास्त्र, कृषिविद्या, फलोद्यान, मृदविज्ञान आणि कृषि रसायन शास्त्र व रोग शास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या