राहुरी - पुस्तकं माणसाची संस्कृती सशक्त करतात म्हणून पुस्तकातूनच क्रांती घडल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतात. डॉ. आंबेडकरांनी म्हणूनच प्रत्येक घरात एक छोटसं ग्रंथालय असावं असा आग्रह तहयात धरला होता. गावागावात प्रबोधन चळवळीचे कार्यकर्ते कीती यावरुन गाव कीती चांगले कीती वाईट हे ठरतं तर गावे जातीविरहित व धर्मविरहित असली तर गावचा नक्कीच उत्कर्ष होतो. त्यामुळे तरुणाईने चांगल्या मार्गातून धनसंपत्ती मिळवायला हवी त्यातूनच आपलं अस्तित्व व ओळख निर्माण होते वाइट विचार व दुर्गुणांपासून अलिप्त राहण्याचा संकल्प तरुणाईने करावा तीच जयंतीदिनी बाबासाहेबांना मानवंदना ठरेल असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विक्रम कांबळे यांनी केले.
तालुक्यातील चिंचोली येथे भिमजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच गणेश हारदे होते तर विचारपीठावर प्रा. संभाजी गदादे, बामसेफचे नवनाथ शिंदे, अतुल आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यासारख्या उपेक्षित घटकांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल यथोचित सन्मान उत्सव समितीतर्फे करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा. कांबळे म्हणाले जी व्यवस्था तुमच्या जीवनात प्रकाश करु शकत नाही. ती व्यवस्थाच नाकारायला हवी. महापुरुषांनी अत्यंत कमी वयात क्रांती केली, पणं सहजासहजी न होता त्या क्रांतीची सुरुवात करताना त्यांना विविध सामाजिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. डॉ. आंबेडकरांनी तथागत बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले व संत कबीर हे तीन गुरु मानले. तीनही वेगवेगळ्या जातीचे तथागत बुध्द कुणबी मराठा, संत कबीर मुसलमान तर महात्मा फुले माळी तीघेही अस्तित्वात नसताना डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. परंतू त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आयुष्यभर व्यवस्थेविरोधात संघर्ष चालू ठेवला. रायगडाच्या पायथ्याशी मनुस्म्रुती जाळत त्यांनी मनुवादी व्यवस्थेवर कोरडे ओढण्याचा अविरत संघर्ष केला. बुध्दाची तत्वनीती व छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेच्या राज्याची निती त्यांनी भारतीय संविधानातून मांडली. म्हणूनच विविध जातीधर्माच्या तसेच संस्कृतीच्या विविधतेतून एकतेच प्रतीक असलेलं संविधान लोकशाहीच्या रुपाने देशाला दिलं. आज हिच व्यवस्था नाकारण्याचं काम देशातून होत असल्याचं वास्तव आपण पाहात आहोत. ते थोपविण्यासाठी महापुरुषांचे विचार अंगीकारण्याची आवश्यकता असून त्यावर चालण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेण्यावर त्यांनी भर दिला. समाजा-समाजात आज विष पेरण्याच काम वर्चस्ववादी करीत आहेत. त्याला बहुजन समाज बळी पडत आहे हे येणाऱ्या पिढीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गागरे, उपसरपंच विलास लाटे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, सर्जेराव लाटे, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष गणेश लाटे, भास्कर लाटे, तंटामुक्ती उपाध्यक्ष चांगदेव राऊत, रायभान नलगे, दिलिप दाढकर, ग्रामपंचायत सदस्य शरद आरगडे, सुनिता काळे, ग्रा.पं. सदस्या सुनिता भोसले, अनिता वारुळे, भाऊसाहेब ब्राम्हणे, संदिप काळे, सचिव गिताराम काळे, माया भोसले, मोनाली भोसले, उत्सव समिती अध्यक्ष संजय भोसले, दत्तात्रय भोसले, आण्णा भोसले, अनुप भोसले, संतोष ठोंबरे, दादासाहेब ठोंबरे, एकनाथ ब्राम्हणे आदिंसह बहुसंख्य मान्यवर व उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन निलेश भोसले तर आभार प्रदर्शन सरपंच हारदे यांनी केले.
0 टिप्पण्या