पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास सौर उर्जा प्रकल्प मंजूर

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत पुणे कृषि महाविद्यालयाच्या पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामार्फत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत भारतातील दुधासाठी प्रसिद्ध साहिवाल, राठी, थारपारकर, गीर, लाल सिंधी तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध खिलार या जातीच्या गायींचे संगोपन व संवर्धन करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विषमुक्त शेती व सेंद्रिय व नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

सेंद्रिय नैसर्गिक शेती करण्यासाठी उर्जेच्या गरजांबाबत देखील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेवलप्मेंट एजन्सी (MEDA) मार्फत ४० के.डब्ल्यू. क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र एनर्जी डेवलप्मेंट एजन्सी हा सौर उर्जा प्रकल्प स्थापित व कार्यान्वित करणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचे प्रयत्नाने हा सौर उर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गोशाळा (डेअरी) साठी लागणारी उर्जा वापराच्या ठिकाणीच नैसर्गिक पद्धतीने निर्माण करून पशूपालन करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्यावरण पूरक पद्धतीने कसा वापर करता येऊ शकतो याचे प्रात्यक्षिक गोपालकांना व शेतकऱ्यांना दाखविता येणार आहे.

महाराष्ट्रातील हा प्रथम व एकमेव सौर उर्जा आधारीत पशुपालन प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (MEDA) चे महासंचालक रवींद्र जगताप, समुद्रगुप्त पाटील, विभागीय महाव्यवस्थापक, पुणे विभाग व विजय कोते, उपसंचालक (लेखा) यांनी हा प्रकल्प मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या