भावी नवरदेवास हळद लावून बोहल्यावर चढण्याचे स्वप्नाचा भंग होताच फसवणूक झालेल्या त्या कुटुंबांनी त्या ठगाला पोलीस ठाण्याच्या बोहल्यावर चढवले

पुणे मुंबई भागातील अनेक कुटुंबाची फसवणूक 

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : सध्या मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने लग्नासाठी भावी वधू शोधणार्‍या मुलांना हळद लावून बोहल्यावर चढण्यापुर्वीच राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथिल शालीराम घरजोडे या ठगाने पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील तब्बल सहा कुटुंबातील मुलांना चक्क 60 हजाराचा चुना लावला. दरम्यान, फसवणूक झालेल्या त्या कुटुंबातील नातेवाईकांनी अखेर त्या ठगाचा शोध घेऊन त्याला राहुरी पोलीस ठाण्याच्या बोहल्यावर उभे केले.

या ठगाने आमच्याकडे गरीब मुलींची सेवाभावी संस्था आहे. त्यांना तुमची गरज असून चांगल्या शिकलेल्या मुलींचे स्थळे असल्याचे सांगत पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील जवळपास सहा मुलांना राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथील शालीराम घरजोडे ठगाने प्रत्येकी 10 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आला.

त्या ठगाने त्या कुटुंबातील नातेवाईकांना नवरदेव मुलासह सोन्याचे दागिने घेऊन लग्नाच्या तयारीने या असा निरोप पाठवून चक्क पुण्याहून नगरला बोलावले. मात्र, त्या ठगाचे तेथेच पितळ उघडे पडले आणि तो राहुरी पोलीस ठाण्याच्या बोहल्यावर चढविला गेला. पुण्यातील मुळशी येथील ते सुशिक्षित असलेले सहा कुटुंब वधू संशोधनाच्या नादात अगदीच हातोहात फसविले गेले. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील जवळपास सहा लग्नाळू मुलांना आमच्याकडे गरीब शिक्षीत मुलींची सेवाभावी संस्था आहे. या मुलींना आपल्यासारख्या चांगल्या घरातील मुलांशी लग्न करून संसार थाटण्याची इच्छा आहे. त्यासाठी या महाभागाने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार या लग्नाळू मुलांनी प्रत्येकी दहा हजार रुपये ऑनलाईन खात्यावर टाकले. तसेच या मुलांच्या पालकांनी लग्नानतंर या संस्थेला पन्नास हजार रुपयांची देणगी देण्याचेही कबूल केले होते.

त्या अनुषंगाने या ठगाने या कुंटुबांना पुन्हा आणखी दहा हजार रुपयांची मागणी करून लग्नाची तयारी करून नगरला येण्याचे सांगितले. मुलाच्या भावी वधूचे स्वप्न रंगवित ते सहा पीडित कुटुंब नगरला आल्यानंतर या ठगाने त्यांना काही मुलींच्या वडिलांचे फोन नंबर दिले. फोन करून नवरी मुलीबद्दल विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुळशीकरांनी या ठगाला शोधून काढुन राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तर ते पीडित कुटुंब राहुरी पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसलेले होते.

या महाभागाने पुणे, मुंबई भागातील अनेक मुलांना लग्नासाठी मुली असल्याचे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला असल्याची शंका मुळशीकरांनी व्यक्त केली आहे. सध्या मुलींचे प्रमाण अत्यंत कमी आणि लग्नाळू मुलींची घटती संख्या चिंताजनक बनली आहे. त्यामुळे अनेक भावी वरांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भावी वधूचा शोध घेताना नाकीनऊ येत आहेत. तर हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या मुलींच्या जाचक अटी असल्याने त्या पूर्ण करताना मुलांसह त्यांच्या कुटुंबाची पुरती दमछाक होत आहे. त्याचाच गैरफायदा घेत अनेक ठगांनी आपली दुकानदारी सुरू केली असून अनेक कुटुंबे आर्थिक फसवणुकीला बळी पडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या