स.भु.प्रशालेत २५ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा


रौप्यमहोत्सवी स्नेहमिलनात जुन्या आठवणींना मिळाला उजाळा 

विलास लाटे/ढोरकीन : पैठण तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेतील सन १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रविवारी  (दि.१०) श्रीराम नवमीचे औचित्य साधून रौप्यमहोत्सवी स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचा दुर्मिळ योग जुळून आला. खुप वर्षांनंतर वर्गमित्र व गुरुजन एकत्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

दरम्यान पुर्वी प्रमाणे शाळेची घंटा वाजवून या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. ज्या वर्ग खोलीमध्ये विद्यार्थी बसत होते, त्याच बेंचेस वर विद्यार्थी जाऊन बसले. सर्वांनी आग्रहपूर्वक गणित विषयाचे शिक्षक ज्ञानेश्वर चाटुपळे यांना गणित विषय शिकवायचा आग्रह धरला. मराठी विषयाच्या कविता म्हणायला लावल्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा शालेय दिन सर्वांनाच एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला. शिक्षणानंतर नौकरी, व्यवसायासाठी तसेच प्रपंचासाठी एकमेकांपासून ताटातूट झालेले वर्गमित्र आपली शाळा, वर्गमित्र व गुरुंना पुन्हा एकदा एकत्रित पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे काही मुली मुंबई, पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ज्या शिक्षकांच्या सहवासात राहून ज्ञानाची शिदोरी घेतली अशा सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता बाळगून त्यांचा आदरपूर्वक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह  देऊन यथोचित सन्मान देखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन भांडूरे यांनी तर सूत्रसंचालन कवी मच्छिंद्र धनवटे यांनी केले. तसेच आभार खंडू विर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यानी सुरूची भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा भेटण्याचा संकल्प‌ करून एकमेकांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला.

या कार्यक्रमास शिक्षक मधुकर दानशूर, प्रकाश राऊत, मोहन आडसरे, पोपट भालेराव, ज्ञानेश्वर चाटुपळे, रंजना भालेराव, शांतीलाल रूळे, शेषराव गोर्डे, सत्यनारायण तिवारी, बाबासाहेब गोर्डे, जितेंद्र बुरकुल तर विद्यार्थ्यापैकी परमेश्वर नलावडे, प्रभाकर भालेकर, प्रतिभा भालेराव, शुभांगी खादगांवकर, संजय शरणागत, कैलास नलावडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या