जाणुन घेऊयात कोण आहेत एप्रिल महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे. यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.

एप्रिल 2022 या महिन्याकरीता शेतकरी आयडॉल म्हणुन सातमाने, ता. मालेगांव, जिल्हा नाशिक येथील रविंद्र पवार व कृषि उद्योजक म्हणुन पुणे कृषि महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषि) चे शिक्षण घेतलेले मोहोळ जि. सोलापूर येथील किरण कोठारी यांचा समावेश आहे.

रविंद्र पवार यांनी डाळिंबाची शेती करुन युरोप तसेच आशिया खंडामध्ये निर्यात करत आहेत. त्यांनी शेतीत वापरण्याजोगी यंत्रे स्वतःच्या अनुभवावरुन तयार केली असून 90 टक्के शेती मजुरमुक्त केली आहे. कृषि उद्योजक असलेले किरण कोठारी यांनी कोठारी ॲग्रीटेक प्रा.लि.च्या माध्यमातून अत्याधुनिक इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकर्यांसाठी दर्जेदार उत्पादने तयार केली आहेत. युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने मॅन्युफॅक्चरींगमध्ये 100 टक्के ॲटोमेशन करुन उत्पादनांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना सर्व उत्पादनांचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानंकाप्रमाणे ठेवण्यात यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या