आमच्या एका विद्यार्थिनीस सुवर्ण पारितोषिक मिळाले म्हणून, त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मी मी त्यांना सहज विचारले, तुम्ही कुठून येता? आणि जिथून येता तिथून इतक्या बस तुम्हाला बदलावे लागतात मग कसं शक्य होतं. त्या म्हणाल्या सर मी प्रवेश घेतला त्यानंतर डायरेक्ट परीक्षेला आले. कारण मला घरचं सगळं करावं लागतं. शेणकुर करण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, भांडी कुंडी केरकचरा, सगळे करून महाविद्यालयात येणे शक्य नव्हतं. म्हणून मी घरीच राहून सगळा अभ्यास करत गेले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तिला अनेक पारितोषिकं त्या काळात मिळाली होती.आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे घरकाम कट्टा.
महाविद्यालयांमधून अगदी शहरी व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे असतात की जे, घरचं सगळं काम सांभाळून महाविद्यालय करतात. यामध्ये मुले आणि मुली दोन्ही समान आहेत. मुलींच्या बाबतीत तर सकाळी लवकर उठून घरचं सगळं आवरून सगळ्यांचा स्वयंपाक करून स्वतःचा डबा घेऊन महाविद्यालयात येऊन पुन्हा तास सगळे संपवून लगेच पुन्हा घरी जाऊन पुन्हा सगळं काम करायचं. अगदी गाई-म्हशींच्या किंवा गुरांच्या धारा काढण्यापासून तर वैरण कापून किंवा शेताततून घास आणून तो गुराढोरांना खाऊ घालने. किंवा ज्या मुलांच्या घरी पारंपरिक व्यवसाय असतात तिथं त्या त्या गावात ती ती मुले काम करताना दिसतात. अगदी मनापासून हे सर्व करतात. कपडे शिवणे, किंवा पेट्रोल पंपावर पार्ट टाइम जॉब करतात, दुकानात सर्व कामे करतात. शेतकऱ्यांच्या मुलांना तर सर्व प्रकारचे काम करावे लागतेच. पाटाला पाणी आल्यानंतर दारी धरने, रात्री लाईट असते त्यावेळी मोटार चालू करून शेतीला पाणी देणे ही व अशी अनेक अनंत कामे या मुलांना करावी लागतात. या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
ज्यांच्या घरी हॉटेल आहे ती मुले हॉटेलमध्ये, कपड्याचे दुकान आहे तिथे कपड्यांच्या दुकानांमध्ये, केश कर्तनालय, सुतारी काम, चपला सांधायचं काम, मडकी तयार करायचं काम, अशी पारंपरिक सर्व कामे मुलं मुली करत असतात.
याव्यतिरिक्त काही मुलं वेगवेगळ्या दुकानांमधून, संस्थांमधून पार्टटाईम काम करतात. त्यातून यांना काही जणांना थोड्या प्रमाणात का होईना ! मोबदला मिळतो . व त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटतो. त्याविषयी आपण उद्योजकता आणि कमवा व शिका या दोन कटटयांमधून याआधी बोललो आहोत. परंतु जी मुलं घरकाम पूर्णपणे करून आपला उदरनिर्वाह करतात आणि महाविद्यालय पूर्ण करतात खरतर हा कट्टा त्यांना समर्पित आहे नगर जिल्ह्यातील म्हशींच्या धारा काढणाऱ्या एका मुलीचं कौतुक आपण सगळ्यांनी मागच्या महिन्यामध्ये पाहिलेला आहेच तसंच काहीसं हे सगळं असतं विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये कौतुक करावं, तेवढं थोडं आहे! कारण सकाळी पहाटे लवकर उठून साडेसातला महाविद्यालयात पोहोचायचं असेल तर साडेसहाला त्यांना बस किंवा एस टी असते म्हणजे पाच किंवा चार वाजता उठून सगळं आवरून सगळा स्वयंपाक करून डबा घेऊन या मुली महाविद्यालयात येतात घरी गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक आणि घरकाम सगळं करायचं आणि मग वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा असा सगळा यांचा दिनक्रम असतो. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...
अशी कामं करणारी मुलं ही नेहमी अष्टावधानी असतात विशेषत: स्वयंपाक करणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांचं अष्टावधान हे कमालीचं असतं. एकाच वेळी पीठ मळताना, त्यात पिठामध्ये पाणी किती घालायचं ? मीठ किती? दुसरीकडे भाजी करपणार नाही? याची काळजी? तिसरीकडे भाकरी किंवा चपाती तव्यावर खाली घ्यायची? चूलीला सरपन, सरकवत भाजीची चव बिघडणार नाही, याची काळजी घेत एकाच वेळी हे सगळे करावे लागतात. आणि म्हणून ही मुलं किंवा मुली अत्यंत तल्लख बुद्धीची असतात. आणि म्हणूनच ती अभ्यासात सुद्धा तेवढीच हुशार असतात. यापैकी बऱ्याच मुलांना, अवांतर उपक्रमांमध्ये , अर्थात अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही.
वास्तविक स्वयंपाक हा अभ्यासक्रमाचा भाग झाला पाहिजे! किंवा शेती सुद्धा अभ्यासक्रमाचा भाग झाला पाहिजे. जसे चार चाकी ड्रायव्हिंग क्लास असतात तशी ट्रॅक्टर चालवायचा क्लास कुठेच नसतो!!! वास्तविक शेतकऱ्यांच्या मुलांना संशोधन वृत्ती ही जन्मजात असते! त्यांना जुगाड हा जमतो आणि जमतोच यांची खरतर क्रेडिट करता आले पाहिजेत...
लहान वयापासून शेतीविषयक शिक्षण दिले गेले पाहिजे! सरी कशा काढायच्या? नांगर कसा धरायचा? गाई, बैल, म्हशी शेळ्या यांची निगराणी कशी करायची. धारा कशा काढायच्या ! बैलगाडी कशी जूपायची हा शिक्षणाचा भाग झाला पाहिजे. अगदी खुरपायच कसं ? निंदनी कशी करायची. आणि पेरणी कशी करायची? भाताची लावणी कशी करायची? शेतकऱ्यांच्या मुलांना झाडांची पाने बघून या झाडांमध्ये कशाची कमतरता आहे हे सांगता येणे म्हणजे शिक्षण.
माती परीक्षण, पाणी परीक्षण, दुधाचे परीक्षण , हा सगळा शिक्षणाशी नातं जोडण्याचा प्रकल्प व्हायला हवा...
या सगळ्याची सांगड क्रेडिटशी आपल्याला घालता आली पाहिजे. या सगळ्याची क्रेडिट आपल्याला देता आली पाहिजेत...
स्वयंपाक करणं... करण्याचीसुद्धा क्रेडिट जमली पाहिजेत. भाकरी आल्या एक क्रेडिट वेगवेगळ्या भाज्या आल्या आणखीन एक क्रेडिट. कारण या सर्व गोष्टी जीवनावश्यक आहेत. कसलातरी थातूरमातूर कोर्स करून त्याला क्रेडिट देण्यापेक्षा.
दाढी, कटींग करणाऱ्या मुलांना घरून सर्टिफिकेट घेऊन क्रेडिट देता आले पाहिजे. सुतारी काम करणाऱ्या मुलांना, कपडे शिवणाऱ्या मुलांना, चपला , नवीन प्रकारच्या शिवणाऱ्या मुलांना ,अगदी फॉल , पिको , कटिंग करणाऱ्या मुलींना याची क्रेडिट देता आली पाहिजेत. ही क्रेडिट अर्थातच क्रेडिट बँकेमध्ये जमा करता आली पाहिजेत...
नवीन शैक्षणिक धोरणात हे सर्व शक्य आहे. पूर्वी आपण कार्यानुभव किंवा समाजसेवा असे तास करायचो. कार्यानुभवाच्या तासाची अनेक जण आवर्जून वाट पहात असायचे. कारण त्यात नवीन काहीतरी शिकायला मिळायचं. अगदी सरकी काढण्यापासून चरखा चालवण्या पासून तर कपडा वीणन्यापर्यंत. टकळी कशी धरायची? हे सगळं शिकवलं जायचं. आज हे कुठेतरी मागे पडले आहे...
घरकाम करणाऱ्या मुला-मुलींचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे चला तर घर कामाला हातभार लावू या!!!
वेळ मिळेल तसं काम करूयात!!! काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः काम करूयात!!!
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या